जलोदरावर रामबाण पूर्ण शलभासन 

सुजाता टिकेकर 
 
 
शलभासन हे विपरीत शयनस्थितीतील आसन आहे. या आसनात दोन प्रकार येतात. अर्धशलभासन आणि पूर्णशलभासन पोट जमिनीला खाली टेकवून करावयाचे हे आसन अतिशय फायदेशीर आहे. 
शलभ म्हणजे टोळ. शरीराची टोळाप्रमाणे अवस्था म्हणजे शलभासन. 
प्रथम आपण अर्धशलभासन पाहूया. 
अर्धशलभासन 
यामध्ये पालथे झोपावे, हनुवटी जमिनीवर टेकवावी, दोन्ही हात मांड्याना लावून ठेवावे. अथवा मांड्यांखाली ठेवले तरी चालतील. श्‍वास घेत शरीर ताठ करुन डावा पाय गुडघ्यामध्ये ताठ उचलावा. जेवढा सहज पाय उचलता येईल तेवढाच वर न्यावा. अतिरिक्त ताण देऊ नये. श्‍वास सोडत हळूहळू पाय जागेवर घ्यावा. हीच क्रिया उजव्या पायाने करावी. अशा पद्धतीने अर्ध शलभासन रोज सात ते आठ वेळा नियमित करावे. यामुळे कंबरेखालचे स्नायू मजबूत होतात. पोट साफ रहाते.
स्त्रियांचा कंबरदुखीचा त्रास कमी होतो. पोटाला चांगला व्यायाम मिळाल्यामुळे आतड्यातील मळ बाहेर टाकण्याची क्रिया सक्षम होते. हृदयावर आणि मूत्राशयावर उत्तम ताण पडतो. ज्यामुळे ती वेगाने कार्य करु लागतात. आम्लपित्त झाले असेल तर या आसनाचा उपयोग होतो. पायांच्या तळव्याचे विकार तसेच, अपेंडिसायटिससारखा आजार बरा होण्यास हे आसन उपयुक्त आहे. अर्धशलभासन हे वृद्ध व्यक्तींना करावयास सोपे आहे. एकेक पाय गुडघ्यात न वाकवता ताणताना सावकाश क्रिया केली जाते. अर्धशलभासनाचा कालावधी पंधरा सेकंदापर्यंत आहे. 
आता आपण पूर्णशलभासनाची कृती पाहू या. 
पूर्णशलभासन 
पूर्णशलाभासनातसुद्‌धा दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात हनुवटी जमिनीला टेकवून जमिनीवर पालथं झोपवून पाय गुडघ्यात वाकवू न देता दोन्ही पाय उचलतो. हात जमिनीवर पालथे ठेवतो. यामध्ये श्‍वसन करताना आसनस्थिती श्‍वास रोखून धरला जातो व पाय खाली आणताना श्‍वास सोडला जातो. 
पूर्णशलभासनाच्या दुसऱ्या प्रकारात हात छातीजवळ घेऊन पंजे जमिनीला टेकवले जातात व डोके वर उचलले जाते. यामुळे पोटातील स्नायूवर दाब पडतो. जठर, पित्ताशय, प्लीहा, आणि मुत्राशय यांचे कार्य सुधारते. जठराग्नी प्रदिप्त होतो. काही वेळा स्त्रीयांना वजन वाढल्यामुळे हातापायांवर सूज येते. ही सूज कमी करण्यासाठी नियमितपणे पूर्णशलभासनाचा सराव केला असता फायदा होतो. 
मुख्य म्हणजे जलोदरासारखा गंभीर रोग पूर्णशलभासनाने बरा होतो. प्राथमिक अवस्थेतील भगंदर या रोगावर शलभासन हा उत्तम उपाय आहे. पूर्णशलभासनाच्या सरावाने मूतखड्यासारखे, व मधुमेहासारखे रोग पूर्णपणे बरे झाल्याची काही उदाहरणे आहेत. लघवीचे रोग तसेच फुप्फुसाचे विकार बरे करण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण शलभासन नियमितपणे करावे. याचा कालावधी पाच सेकंदापासून सूरू होतो व नित्य सरावाने तीस सेकंदापर्यंत टिकवू शकतो. पाणथरीसारखा रोग शलभासनाने बरा होतो.
स्त्रियांच्या मासिकपाळीच्या तक्रारी दूर होतात. कारण ओटीपोटावर दाब येतो. मुत्रावरोध बरा होण्यास मदत होते. शलभासनामुळे आवाजाच्या तक्रारी दूर होतात. कारण कंठावर ताण येऊन कंठग्रंथी कार्यक्षम होतात. ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी तज्ज्ञाच्या सल्ल्याने ही आसने करावीत. तसेच पाठीच्या कण्याचा विकार, हर्निया आणि आतड्याचा क्षय रोग असेल त्यांनीसुद्धा हे आसन करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. एकंदरीत शलभासनामुळे लहान व मोठे आतडे यांच्यावर चांगल्याप्रकारे ताण येऊन रसोत्पादक ग्रंथींची कार्यक्षमता वाढते.
पूर्णशलभासन त्यामानाने अधिक ताण देणारे जरासे अवघड आहे, पण सरावाने जमू शकते. पाठीच्या कण्यातील शेवटचे मणके, ओटीपोटातील स्नायू, आणि मांड्यातील स्नायू यांच्यावर चांगला ताण आल्याने जलोदरासारखे रोग बरे होण्यास मदत होते. रक्ताभिसरण वाढून कार्यक्षमता वाढते. मुख्य म्हणजे पोटाचे विकार बरे होतात. काही वेळा हे आसन करताना पायांमध्ये कंप निर्मौण होतो. पण तो तात्पुरता असतो. सरावाने स्थिरता येते. काहीजणांचे पाय जास्त वर उचलले जात नाही. पण ते जायला हवेत. त्यासाठी तज्ञ योगशिक्षकाचे मार्गदर्शन हवेत. अर्ध आणि पूर्ण शलभासनात संथ श्वसन चालू ठेवावेत. त्यासाठी स्थिरता आवश्‍यक आहेत. प्रारंभी हाताचा रेटा देऊन पाय वर उचलण्यास मदत घेतली तरी चालते. पाय सरळ ठेवणे गुडघ्यात वाकू न देणे हेच महत्त्वाचे असते. प्रत्येकाने अर्ध आणि पूर्णशलभासनाचा नित्य सराव शरीर सुढ करण्यासाठी करावा. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)