जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडला!

उपद्रवींच्या प्रतापामुळे तीन तास पाण्याची नासाडी
 
पुणे – मागील आठवड्यात पर्वती जलकेंद्राला धरणातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याची घटना ताजी असतानाच आता हा व्हॉल्व्ह मद्यपींकडून गुरूवारी रात्री तोडण्यात आल्याने तब्बल तीन तास महापालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

या व्हॉल्व्हचे झाकण तोडण्यात आल्याने त्यातून आधी मोठ्या प्रमाणात हवा बाहेर आली आणि त्यानंतर पाणी आले. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी मोठा गोंधळ उडाला होता. खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी 1,600 मि.मी व्यासाची धरणाकडून येणारी जलवाहिनी आहे. यातून गुरुवारी पाणी घेतल्यानंतर ती बंद करण्यात आली होती. मात्र, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही उपद्रवींकडून या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या व्हॉल्व्हची तोडफोड करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी या व्हॉल्व्हचे हवा सोडण्याचे झाकण काढण्यात आले. त्यामुळे या जलवाहिनीत असलेली हवा मोठ्या प्रमाणात बाहेर आली. त्याचा मोठा आवाज झाल्याने चुनाभट्टी परिसरात गोंधळ उडाला. त्यानंतर हवा बाहेर पडताच; या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच पुन्हा घरात पाणी घुसण्याच्या भीतीने या भागातील नागरिकांची धावपळ झाली.

दरम्यान, याची माहिती मिळताच, पर्वती जलकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने व्हॉल्वची पाहणी केली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे व्हॉल्व्ह बंद करणे शक्‍य नसल्याने काही अंतर मागे जाऊन दुसरा व्हॉल्व्ह बंद करून पाणी आटोक्‍यात आणण्यात आले. मात्र, त्यासाठी सुमारे तीन तासांची कसरत केल्यानंतर मध्यरात्री 1 वाजता हे पाणी बंद करणे प्रशासनास शक्‍य झाल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)