जलवाहतुकीला चालना देणार: गडकरी

पुणे,- वाहतुकीसाठी रस्ते, हवाई आणि रेल्वेमार्गांसह जलवाहतुकीला चालना देण्यात येणार आहे. देशातील नद्यांवर जलवाहतूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे परदेशात आणि देशात कमी वाहतूक खर्चात फलोत्पादन पाठविता येणार आहे. त्यासाठी ऍग्रीकल्चर प्रोड्युस एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंटने (आपेडा) पुढाकार घेतला पाहिजे.असे केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे 57 वे वार्षिक अधिवेशन झाले. त्यावेळी उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, सोपान कांचन, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी द्राक्षवृत्त या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
फळांची मागणी वाढविणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्ष, संत्री, सफरचंद यांसारख्या फळांची विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर कायमस्वरुपी विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत; तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. असे गडकरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, फलोत्पादनामध्ये राज्य आघाडीवर आहे. त्यामध्ये द्राक्ष उत्पादकांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये फळांची मागणी वाढविण्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर येथे कायमस्वरूपी फळविक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. द्राक्ष, बेदाणे आणि वाइन उत्पादनामध्ये संशोधनाची जोड दिली गेल्यास गुणवत्तावाढ होऊन उत्पादनावरील खर्च कमी होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

पारंपरिक पिके घेतली पाहिजेत, असे वक्तव्य केंद्रीय पातळीवरून काहींनी केले आहे.त्या वक्तव्यांचा समाचार शरद पवार यांनी आपल्या भाषणात घेतला, ते म्हणाले, पारंपरिक पीक घेऊन आता चालणार नाही. नवीन वाण देशात आणले गेले पाहिजेत. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे अत्यावश्‍यक आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना परवडणारे आधुनिक तंत्रज्ञानावरील यंत्रे, मार्केटिंग आणि शीतगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत.

फुंडकर म्हणाले, द्राक्षे आणि बेदाणे विक्रीसाठी एक सप्टेंबरपासून निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष आर्वे यांनी प्रास्ताविक केले, तर कैलास भोसले यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)