‘जलयुक्‍त’वरच नवनियुक्‍त जिल्हाधिकारी द्विवेदींचा “फोकस’

संग्रहित छायाचित्र

नगर- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी दुपारी राहुल द्विवेदी यांनी सूत्रे स्वीकारली. जिल्ह्यातील प्रश्‍न समजावून घेऊन थेट गावपातळीवर संपर्क ठेवून विकास योजना मार्गी लावण्याचा मनोदय व्यक्त करीत जलयुक्‍त शिवार अभियान योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीस आपले प्राधान्य राहील, असे सूतोवाच नवनियुक्‍त जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

द्विवेदी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामनराव कदम, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी एन. एस. भदाणे, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, गणेश मरकड, आर. एफ. शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मावळते जिल्हाधिकारी अभय महाजन यांची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात उपसचिवपदी बदली झाली. महाजन यांच्या जागी वाशिम येथे जिल्हाधिकारी असलेले द्विवेदी हे रुजू झाले. वाशिम येथे असताना ग्रामविकास योजनांसह कृषिपूरक योजनांची यशस्वी अंमलबजावणी, जलयुक्‍त शिवार अभियानात भरीव काम त्यांनी केले.

-Ads-

द्विवेदी म्हणाले, “”जिल्हा प्रगतशील विचारांचा असून विस्ताराने मोठा आहे. सहकार चळवळीचा पाया नगरमध्येच रचला गेला. येथे पदभार स्वीकारताना आपल्या मनात कोणताही पूर्वग्रह नाही.” या जिल्ह्यातील सेवेच्या कार्यकाळात आपणास खूप काही शिकता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली. कल्याणकारी योजनांची गतीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या कर्मचाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचाशी थेट संपर्क-संवाद केला जाईल, असे द्विवेदी म्हणाले. जिल्हा आकारमानाने मोठा असल्याने प्रत्येकाशी समन्वय ठेवून वेगाने काम मार्गी लावण्यावर आपला भर राहणार आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात होण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने समन्वय प्रस्थापित करण्यावर आपला भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मागेल त्याला शेततळे यासह इतर योजना प्रभावीपणे जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न करू. या कामी सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळेल, असा आशावाद द्विवेदी यांनी व्यक्त केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)