“जलयुक्‍त’मध्ये अडीच हजार टीसीएम पाणीसाठा

हेमंत निकम : बारामती तालुक्‍यात तीन वर्षांत 1620 कामे पूर्ण

दीपक पडकर
जळोची – राज्यात अनेक वर्षांपासून पाणी संकट निर्माण झाले होते. दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या जनतेला “जलयुक्‍त शिवार’चा आधार मिळाला. बारामती तालुक्‍यात 1620 कामे पूर्ण झाली असून यामध्ये दोन हजार 500 टीसीएम पाणीसाठा होणार असल्याची माहिती जलयुक्‍त शिवार योजनेचे अध्यक्ष हेमंत निकम यांनी दिली.
महाराष्ट्रातील गावे पाण्यासाठी समृद्ध व स्वयंपूर्ण झाली पाहिजे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाने सर्व खात्यांना एकत्रीत करून संपूर्ण राज्यात जलयुक्‍त शिवार योजना कार्यन्वित केली. त्यामध्ये बारामती तालुक्‍यात याचयोजनेद्वारे करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कामातून तालुक्‍यात अडीच हजार टी.सी.एम.पाणीसाठा वाढणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक यंत्रणेकडे पुरेसा निधी नसतो, प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव असतो. दुरुस्ती व देखभालव्यवस्थित नसते आणि पाणीपट्टी वसूल करणे जमत नाही. त्यामुळे यंत्रणा कामच करू शकत नाही. पाणी विकत देणे हे कायद्याने बंधन असल्यामुळे पाणीपट्टी आकारणे जड जाते. ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन यंत्रणांचे अस्तित्वसुद्धा जाणवत नाही. ग्रामपंचायतींना हीच बाबदारी नको आहे, तर शहरांमधील प्राधिकरणाला ते लोढणे झाले आहे. गावांना पाणी पुरवायला पुढे येणार कोण, याचे उत्तर कुणालाही सापडत नाही. आपल्या सामाजिक-राजकीय आयुष्याचे ते प्रतिबिंब पाणी प्रश्‍नात दडले आहे. यंत्रणा असेल तर पाण्याचा मोबदला द्यायला नागरिकांची तक्रार नसते. म्हणूनच जलयुक्‍त शिवार योजना ग्रामीण भागांना वरदान ठरणार आहे.

  • 252 किमी ओढ्याचे काम पूर्ण
    बारामती तालुक्‍यात जलयुक्‍त शिवार योजनेत 2015-16 मध्ये 16 गावांमध्ये 692 कामे पूर्ण झाली तर 2016-17 ला 17 गावांमध्ये 753 कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर 2017-18 मध्ये 19 गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाबरोबर सहभाग घेत 175 कामे पूर्ण झाली आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 252 किमी ओढ्याचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व झालेल्या कामात अंदाजे अडीच हजार टी.सी.एम पाणीसाठा होणार आहे.
  • लोकसहभागाचा सिंहाचा वाटा
    जलयुक्‍त योजनेला नागरिकांचा लोकसहभागाचा सिंहाचा वाटा आहे. शासनाने मशीन दिले, तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच्या लोकसहभागातून डिझेल भरून कामे केली आहे. असे काम करताना नागरिकांनी पक्ष, मतभेद बाजूला ठेऊन काम केले. त्यामुळे जवळपास 1800 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले असल्याचे शेती तज्ज्ञांनी सांगितले.

बारामती तालुक्‍यातील सर्व गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाली पाहिजे . हाच शासनाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक नागरिकांनी आपापल्या परीने या जलयुक्‍त शिवारात योगदान दिले आहे. अधिक काम करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
– हेमंत निकम, अध्यक्ष, जलयुक्‍त शिवार योजना, बारामती विभाग

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)