जलयुक्त शिवार कामांची त्रयस्थ संस्थांमार्फत तपासणी

 

पुणे,  (प्रतिनिधी) – जलयुक्त शिवार अंतर्गत केलेल्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जात आहे. काम सुरू झाल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करतात. कामाचे स्टर्क्‍चर ऑडिट केले जाते. जलसंधारणाच्या कामातून किती पाणी जमा होते. याचाही आढावा घेत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे आरोप होत आहेत. कामांची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी सांगितले, राज्य शासन सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे.या अभियानांतर्गत जिल्ह्यात 2016-17 मध्ये जलयुक्त शिवारची 112 कामे मंजूर करण्यात आली आहेत. अद्यापपर्यंत त्यातील 49 कामे पूर्ण झाली असून 69 कामे प्रगतीपथावर आहेत. या जलयुक्त शिवारच्या कामांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शेतीसाठी संरक्षित पाणी व वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पुरवठा वाढविणे, निकामी जलस्त्रोताची पाणी साठवण क्षमता पुनःर्स्थापित करणे, लोकसहभागातून जलस्त्रोताचा पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडवणे-जिरवणे, नाला सरळीकरण, नवीन पाझर तलाव, गाव तलाव, तलाव, विहिरीतील गाळ काढणे आदी कामे करण्यात आली आहेत. या कामांची तपासणी करण्यासाठी दोन संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. या संस्थांनी केलेल्या तपासणीमध्ये अद्याप तरी कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्या नाहीत. तसेच राज्य शासनाने दिलेल्या गुणवत्ता तपासणी निर्देशानुसार कामांची तपासणी केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)