जलयुक्त शिवार अभियानातील प्रत्येक गावाचे ऑडीट करा

तेव्हापासून द्राक्षे खायचे बंद केले
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते व औषधांचा अधिक वापर होत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे ना.शिवतारे यांनी सांगितले. तसेच सांगली जिल्ह्यात कार्यक्रमानिमित्त गेलो असताना तेथील कृषी अधिकाऱ्यांनी वेलावरून द्राक्षे गळून पडू नयेत यासाठी त्यावर हायड्रोजन सायनामाईड हे औषध फवारले जात असल्याचे सांगितले. त्या औषधाचा धोका ओळखून तेव्हापासून द्राक्षेच खाणे बंद केले, असे शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

ना.विजय शिवतारे यांचे आदेश: कामात हलगर्जी करणाऱ्यांच्या बदल्या करणार

सातारा – सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे झाली मात्र त्या कामामुळे त्या गावातील कृषी क्षेत्रात काय परिवर्तन झाले, पीक पध्दती बदलली का , उत्पादनात वाढ झाली का, पाण्याची पातळी किती वाढली या सर्व बाबींचा गाव पातळीवर अभ्यासकरुन हे ऑडीट पुढच्या बैठकीत सादर करावेत, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिले. तसेच जिल्ह्याला नूतन कृषी अधिक्षक मिळाले आहेत. त्यांनी तालुका स्तरावर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती द्यावी त्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून टाकू, असा इशारा ही शिवतारे यांनी यावेळी दिला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खरीप हंगाम पुर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे , आ. बाळासाहेब पाटील , जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार , कोल्हापूर विभागाचे विभागीय सह संचालक महावीर झंगटे , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती , सर्व तालुक्‍यांचे कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.

परवाने देण्याची पध्दत पुर्ववत करा
खते व बियाणे विक्री परवाने यापुर्वी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाकडून दिला जायचा. परंतु सरकारने आता जिल्हा परिषदेचे अधिकार काढून आयुक्त स्तरावर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले असलेल्या विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब कृषी सभापती मनोज पवार यांनी निर्दशनास आणून दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी, परवाने देताना राजकारण हे होतेच हे ओळखूनच शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, रोगापेक्षा इलाज भयंकर होत असेल तर निर्णयाबाबत फेरविचार करण्यास सरकारला सांगू असे शिवतारे यांनी सांगितले.

पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, सातारा जिल्ह्यात यावर्षी रब्बीतील 54,850 मेट्रीक टन एवढा साठा शिल्लक असून आता यावर्षीच्या खरीपासाठी एकूण 1 लाख 19 हजार मेट्रीक टन एवढ्या खताला मान्यता प्राप्त झाली आहे तर बि बियाणे 47 हजार 225 मेट्रीक टन मागणी निश्‍चित केली असून हे जिल्ह्यासाठी पुरेसे असल्याची माहिती पालकमंत्र्यानी यावेळी दिली. मात्र मागच्या हंगामात खताचा साठा का शिल्लक राहीला याचाही कृषी विभागाकडून अभ्यास व्हावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. आता शेती करताना माती परीक्षण हे अतिशय आवश्‍यक झाले असून शेतीचे आरोग्य कळाल्याशिवाय शेतीचे नियोजन होणे नाही याची जाणिव आता शेतकऱ्यांना होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील तीन लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या शेतीच्या आरोग्य पत्रिका करुन देण्यात आल्याचे सांगून सुक्ष्म सिंचनाचे 4325 लोकांना 11 कोटी पेक्षा अधिकचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. दिवसेंदिवस सुक्ष्मसिंचनाचे महत्व वाढत चालले आहे हे अधिक चांगले असल्याच्याही भावना पालकमंत्र्यानी यावेळी बोलून दाखविल्या. सातारा जिल्ह्यात 1472 हेक्‍टर एवढे क्षेत्र हाळदीच्या लागवडी खाली आले आहे. या उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन यावर प्रक्रीया उद्योगाला चालना देण्यासाठी काम व्हावे यासाठी 4 कोटी रुपयाचा निधीही उपलब्ध करुन देण्यात आल्याचे पालकमंत्र्यानी यावेळी सांगितले. लोकप्रतिनिधींनी या बैठकीत हरभऱ्याच्या विक्री केंद्राबाबत , गाळ काढण्याच्या अनुदानाबाबत जे प्रश्न मांडले आहेत ते राज्यस्तरीय बैठकीत ठेवू अशी ग्वाही दिली.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कृषी विभागाकडून योजनांची अंमलबजावणी करताना अनुदान वेळेत मिळत नाही. तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील तालुका निहाय उत्पादनांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ निर्माण करावी. अधिकाऱ्यांनी ही कामकाज करताना नेमके सरकारकडून कीती निधी येणे गरजेचे आहे हे स्पष्टपणे लोकप्रतिनिधींना सांगावे. असे शिंदे यांनी सांगितले. यावेळीआ. बाळासाहेब पाटील , जि. प. कृषी सभापती मनोज पवार यांनी कृषी विकासासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनिल बोरकर यांनीही खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा सादर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)