जलपर्णी कुजू लागली; नागरिकांच्या त्रासात भर

मोशी – इंद्रायणी नदीत वाढत असलेल्या जलपर्णीबाबत स्थानिकांनी, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्या. वारंवार याबाबत प्रसिद्धी माध्यमातून सचित्र वृत्ते प्रसिद्ध होऊन देखील प्रशासनाची कुंभकर्णनिद्रा तुटली नाही. आता संपूर्ण नदीपात्रास झाकून टाकणारी जलपर्णी नदीतच कुजू लागली आहे. यामुळे प्रचंड दुर्गंध येत आहे व डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र देहु आणि आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अवस्था पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आल्यावर अत्यंत बिकट होते. ही नदी शेकडो वर्षांपासून आपल्या दोन्ही तीरावर वसलेल्या नागरीक आणि शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहे. मोशी हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे व येथील बागायती शेती सुजलाम सुफलाम व्हावी, या उद्देशाने ठिकठिकाणी इंद्रायणी नदीवर बंधारे बांधले आहेत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली परिसरातील औद्योगीक क्षेत्रातील ऑईल मिश्रित सांडपाणी सोडत असल्याने दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जलपर्णीची वाढ होण्यास सुरुवात होते.

वजलपर्णीमुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई होत आहे. तसेच नदीतील जलचर व इतर जल वनस्पती देखील ऑक्‍सिजनच्या अभावी संपत आहेत. प्रदुषित पाण्याचा पिकांवर देखील विपरीत परिणाम होत आहे. त्यात आता ही जलपर्णी कुजू लागल्याने शेतकऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा त्रास वाढतच आहे. उन्हाची तीव्रता वाढली की, पाण्याची पातळी घटू लागते आणि जलपर्णी देखील कुजू लागते. सध्या ही जलपर्णी कुजून असह्य असा दुर्गंध परिसरात पसरला आहे. इंद्रायणीच्या बधांऱ्यावरुन जाणाऱ्या विद्यार्थी आणि कामगारांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागते. कित्येक शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीच्या पाण्याचा वापर बंद केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)