जलद गतीने दाखले देत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा

5 जूनपर्यंत प्रमाणपत्रे उपलब्ध करण्याची आयुक्‍तांची सूचना

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करताना सर्व कागदपत्रे आवश्‍यक आहेत. अर्जासोबत सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वेळेत प्रमाणपत्रे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करतात. त्या पार्श्‍वभूमीवर पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना जलदगतीने 5 जूनपर्यंत प्रमाणपत्रे उपलब्ध करण्याच्या सूचना विभागीय आयुक्‍त व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना देण्यात यावी, याकडे राज्य सीईटी सेलच्या आयुक्‍तांने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम, 2015 मधील तरतुदीनुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (राज्य सीईटी सेल) स्थापना करण्यात आली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए, फाईन आर्ट, वैद्यकीय, शिक्षणशास्त्र, कृषी, विधी, शारीरिक शिक्षण, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरपी इत्यादींचा व्यावसायिक अभ्यासक्रमांत समावेश होतो. या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय, अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी राज्य सीईटी सेलची आहे.

या प्रवेश प्रक्रिया प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात. या प्रवेश प्रक्रियांचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या वेळीच उमेदवारांकडे “राष्ट्रीयत्व व रहिवास प्रमाणपत्र’, एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य राखीव प्रवर्गातील उमेदवारांना “नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट,’ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना “उत्पन्नाचा दाखला’ अपलोड करणे आवश्‍यक आहे. कृषी व मत्स्यकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी या प्रमाणपत्रासोबत सात-बारा उतारा, भूमिहीन कृषी मजूर, मच्छिमार, शेतकरी आणि प्रकल्पबाधित असल्याचे प्रमाणपत्रांची देखील आवश्‍यकता असते, असे राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त आनंद रायते यांनी सांगितले.

तथापि, जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने उमेदवार त्यांच्या प्रवर्गातून अर्ज दाखल करू शकत नाही. परिणामी, त्यांना त्यांच्या प्रवर्गाचे लाभ मिळत नाहीत. उमेदवारांचे आयुष्यभराचे नुकसान होते. तसेच जनमानसातील शासकीय यंत्रणेची प्रतिमा देखील मलिन होते, असेही रायते यांनी म्हटले आहे.

वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून द्या 

सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रे मागणारे अर्ज आपल्या कार्यालयाकडून प्राधान्याने व अति जलद गतीने 5 जून अखेर जारी करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात यावे, असे रायते यांनी संबंधित विभागीय आयुक्‍त व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गातून शिक्षण पूर्ण करणे शक्‍य होईल, असेही ते म्हणाले.

अर्ज करण्यापूर्वीच प्रमाणपत्र प्राप्त करा

विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्‍यकता आहे, त्याची माहिती राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केली आहे. कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी करावी, अशाच सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश विद्यार्थी ऐन प्रवेशाच्या काळातच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करतात. परिणामी, त्याचा जिल्हा प्रशासनावर ताण येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वीच प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)