जलतरण तलाव समस्यांच्या विळख्यात

  • कै. बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव, भोसरी 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा भोसरी येथील कै. बाळासाहेब लांडगे जलतरण तलाव समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथील सुरक्षा, स्वच्छता, विद्युत पुरवठा आणि पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या सर्वच बाबींचा बोजवारा उडाला आहे.

या जलतरण तलावाची क्षमता एका वेळी 100 लोक पोहू शकतात एवढी आहे. मात्र सध्या उन्हाळ्यात पोहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथे एकच सुरक्षा रक्षक असून आणखी एका सुरक्षा रक्षकाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. हा जलतरण तलाव एल आकाराचा असून त्याची खोली 5 ते 14 फूट आहे. हा जलतरण तलाव शहरातील सर्वाधिक खोल व 14 लाख लीटर पाणी क्षमतेचा असून येथे केवळ 2 जीवरक्षक आहेत. त्यामुळे तलावाची खोली लक्षात घेता पोहायला येणाऱ्या लोकांच्या जीवाला मोठा धोका आहे. त्यामुळे येथे आणखी 2 जीवरक्षकांची नेमणूक करणे अत्यंत गरजेची आहे.

तलावाची खोली जास्त असल्यामुळे व दोनच जीवरक्षक असल्याने खबरदारी म्हणून अर्धा तलाव बांबू ठाकून बंद केला आहे. मात्र येथे पोहायला येणाऱ्या लोकांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली. अर्धा तलाव बंद केल्यामुळे अर्ध्याच तलावत पोहायला लागत असल्याने गर्दीमुळे एकच गोंधळ उडत आहे. त्यामुळे बंद तलाव जीवरक्षकांची नेमणूक करून त्वरित चालू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या जलतरण तलावाचा विद्युत पुरवठा वारंवार बंद केला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तलाव बंद ठेवण्याची नामुष्की व्यवस्थापनावर येते. त्यामुळे येथे पोहायला येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत असतो.

येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून जलतरण तलावाच्या समोरील मोकळ्या पोर्चमध्ये व तलावातील आतील बाजूला कचऱ्यांचे ढीग दिसून आले. मात्र कचरा उचलणारी गाडी येथे वांरवार फोन करुनही येत नसल्याची तक्रार व्यवस्थापनाने केली. तलावाच्या समोरील रोडलगतच नागरीक वाहने अस्ताव्यस्त लावत असून त्यामुळे रोडवरील वाहनांना अडथळा होतो. तलावाच्या बाहेरील व आतील विद्युत दिवे झाडांनी वेढले असून ते जुन्या पद्धतीचे पिवळे असल्याने येथे विद्युत प्रकाश व्यवस्थीत पडत नाही व लॉकरची व्यवस्था जुनी असून गंजली आहे. त्यामुळे येथे अद्यावत लॉकरची गरज आहे. तसेच येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

ठेकेदारांचे दुर्लक्ष –
महापालिकेने जलतरण तलावाच्या पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफ-सफाई, यांत्रीक देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठेकेदार नेमले आहेत. मात्र ठेकेदांरानी या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. या ठिकाणच्या परिसरात अस्वच्छता दिसून आली. येथे कचऱ्याचे ढीक दिसून आले. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात दारुच्या अनेक बाटल्या आढळून आल्यामुळे येथील परिस्थिती फारच बिकट आहे. तसेच तलावाच्या परिसरात ठेकदारांचे मोटार, पाईप व इतर साहित्य उघड्यावरच अस्ताव्यस्त टाकले असून अनेक ठिकाणी लाईटच्या वायर उघड्यावरच लोंबकळत आहेत. त्यामुळे पोहायला येणाऱ्या लोंकाच्या जीवाला धोका आहे. येथील पाण्याच्या टाकीला गळती लागली असून त्यातून सतत पाणी वाहत असते. तलावाच्या लगत गटारावरील लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे पोहायला येणाऱ्या नागरिकांना त्यापासून गंभीर इजा होण्याची शक्‍यता आहे.

नागरिकांच्या मागण्या –
– त्वरित 2 जीवरक्षक व 1 सुरक्षा रक्षक नेमावेत.
– जलतरण तलाव परिसरात एलईडी मर्क्‍युरी बसवावेत व झाडांनी आच्छादलेले विद्युत दिवे मोकळे करावे.
– येथील परिसरातील स्वच्छता केली जावी, तसेच येथे दारु पिणारांवर कारवाई करावी.
– बंद ठेवलेला अर्धा तलाव त्वरित सुरू करावा.
– ठेकेदारांचे तलाव परिसरात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य हटवावे.
– पुरुषांची व महिलांची स्वतंत्र बॅच वाढवावी.
– लॉकरची अद्ययावत सुविधा करावी.
– पार्किंगला शिस्त लावावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)