जलतरण तलावासाठी महापालिकेचे नवीन धोरण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ते सेवा शुल्कावर चालवायला देण्याचा प्रशासन विचार करत आहे. यासाठी लवकरच नवीन धोरण ठरवले जाणार आहे, अशी माहिती क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकीचे शहरात एकूण 13 जलतरण तलाव आहेत. या सर्व तलावांची देखभाल, दुरस्ती महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून केली जाते. तलावांच्या जल शुद्धीकरणासाठी दरवर्षी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च होतो. खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे जलतरण तलाव सेवा शुल्कावर चालवण्यासाठी दिल्यास पालिकेचे चार कोटी वाचणार आहेत. याकरिता सस्ते यांनी तसे धोरण ठरवण्याची सूचना क्रीडा विभागाला केली आहे. तसेच हे तलाव खासगी संस्थांना चालवायला दिल्यास त्यांच्याकडून नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये, याकरिता “ना नफा -ना तोटा’ तत्वावर देण्याचे विचार आहे. संबंधीत ठेकेदार अथवा खासगी संस्थेशी करार करताना यामध्ये दर पत्रकाचाही समावेश केला जाणार आहे.

पिंपरी महापालिकाच्या मालकीच्या शहरात 79 व्यायाम शाळा आहेत. 41 व्यायाम शाळा सेवा शुल्कावर चालवण्यास दिल्या आहेत. काही व्यायाम शाळा खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आल्या आहेत. त्यांची कराराची मुदत 2015 मध्येच संपली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने या व्यायाम शाळा अद्यापही परत ताब्यात घेतल्या नाहीत. अशा व्यायाम शाळा क्रीडा विभाग आपल्या ताब्यात घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)