जलतरण तलावाला समस्यांचा विळखा

कै. अण्णासाहेब मगर तलाव : अपुरे कर्मचारी, नागरिकांचा जीव धोक्‍यात

प्रशांत होनमाने
पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे सध्या पोहायला येणाऱ्या लोकांची कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर गर्दीच-गर्दी दिसून येते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी येथील व्यवस्था कोलमडली आहे. या जलतरणासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आणि दोन जीवरक्षक असल्याने येथील सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथे पोहायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि जीव धोक्‍यात असल्याचे दिसून आले.

-Ads-

या जलतरण तलावाची क्षमता एका वेळी केवळ 200 ते 250 लोक पोहू शकतील एवढीच आहे. मात्र असे असताना येथे 300 ते 350 लोक एकाच वेळी पोहत असल्याचे चित्र आहे. या लोकांच्यासाठी येथे केवळ दोनच जीव रक्षक काम करत आहेत. तर जलतरण तलावातील तळातील फरश्‍याही काही ठिकाणी फुटल्या असून त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत. मात्र त्यांच्यावर प्राथमीक उपाचार करण्यासाठी येथे साहित्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे त्वरीत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. येथील तिकीट घरासमोर वीज नसल्याने अंधारातच तिकीट काढण्यासाठी लोकांना तासन्‌तास रांगेत उभे राहतात. तर दुसऱ्या मजल्यावर जलतरण तलावाजवळील पोर्चमध्येही वीजेची सुविधा नसल्याने सकाळी 6 च्या बॅचसाठी येणाऱ्या लोकांना अंधारातच चाचपडावे लागते.

प्रवेशद्वारापाशी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे गर्दीच्या वेळी तिकीट काढण्यासाठी वादावादी, धक्काबुक्की व स्थानिकांकडून दमदाटी केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच रविवारी येथे मोठी गर्दी होत असून तिकीट देण्यासाठी येथील स्थानिक लोक राजकीय दबाव टाकतात. व्यवस्थापकास धमकावणे व धक्काबुकी करत असल्याचा प्रकारही घडला आहे. तसेच तिकीट घराच्या आतील पोर्चमध्येच अस्ताव्यस्त दुचाकी गाड्या लावल्या जात असून स्विमिंग टॅंककडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा अडथळा होत आहे.

येथे पोहायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीने उच्चांक गाठला असून हा जलतरण तलाव अपुरा पडत आहे. गर्दीमुळे येथील सर्वच कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. येथील कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे गणवेश नाही, त्यामुळे गर्दीच्या वेळी ते ओळखू येत नाहीत. तसेच येथील गर्दीमुळे पुरुषांचे स्वच्छतागृह बंद ठेवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. येथील स्वच्छतागृहातील फरशा तुटल्या असून बेसीनमध्येही गुटखा व तंबाखू खावून लोक थुंकत असल्याचे समोर आले आहे. तसेच येथील शॉवरची मोडतोड झाली आहे. चेंजिंग रुम बंद असल्याने पुरुष व लहान मुलांना आपले कपडे उघड्यावरच बदलावे लागत आहेत. तसेच येथे साहित्य ठेवण्यासाठी असलेले लॉकर अतिशय कमी असून लॉकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या मागण्या
– सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी
– 5 ते 6 जीव रक्षकांची नियुक्ती करावी
– तिकीट घर व जलतरण तलाव परिसरात वीजेची सोय करावी
– जखमींवर उपचार करण्यासाठी प्राथमिक उपचार साहित्याची सोय करावी
– येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी
– कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड असावा
– जीव रक्षकांसाठी रिंग व बांबूची सोय करावी
– तलावातील व स्वच्छतागृहातील तुटक्‍या फरश्‍या बदलाव्यात
– पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी.
– तिकीट खिडकीजवळ लोखंडी बार लावावेत

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)