जलतरण तलावांच्या ऑडिटसाठी समितीची मात्रा

संग्रहित छायाचित्र

महिनाभरात अहवाल सादर होणार 


तळजाई येथील घटनेनंतर पालिकेला जाग

पुणे – तळजाई टेकडीवरील महापालिकेच्या क्रीडा संकुलातील जलतरण तलावात प्रफुल्ल वानखेडे या 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे या तलावांचे सुरक्षा ऑडिट करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या दोन आठड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला होता. त्यानुसार आता समितीची स्थापाना करण्यात आली आहे.

प्रस्तावानुसार, पालिकेच्या तलावांची तपासणी करण्यासाठी सहा सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून पुढील महिनाभर या तलावांची पाहणी केली आहे. तसेच या पथकाने केवळ या तलावांच्या सुरक्षेचा अहवाल द्यायचा नाही, तर प्रत्येक बाबीची तपासणी करून कोणत्या तलावाच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आहे, कोणत्या नाहीत, त्यांच्या पूर्ततेसाठी काय उपाय योजना आवश्‍यक आहेत. याचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेकडून शहरात उभारण्यात आलेले जलतरण तलाव पालिकेस चालविणे शक्‍य नसल्याने ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तलावांमध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी खूप असते. अशावेळी महापालिकेने घालून दिलेले सुरक्षा नियम ठेकेदारांकडून पाळले जातात की नाही, हे तपासणे महापालिकेची जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सर्व तलावांची सुरक्षा तपासणी करून भविष्यात होणाऱ्या अशा दुर्घटनांना पायबंद घालावा, अशी मागणी नागपुरे यांनी प्रस्तावात नमूद केले होते.

त्यानुसार, या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. तसेच आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून समिती स्थापनही केली नाही तसेच अहवालही ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली होती. तर आयुक्त राव यांनीही स्थायी समिती ही महापालिकेची प्रमुख समिती असून समितीमध्ये देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले होते.

जबाबदारी क्रीडा विभागाकडे
जलतरण तलावांच्या ऑडिटसाठी प्रशासनाकडून सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव वावरे, भवन रचना विभागाचे उप अभियंता शिशीर बहुलीकर, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उप अभियंता मिलिंद घोलप यांच्यासह क्रीडा विभागाचे गोपाळ चव्हाण आणि राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीचा एक प्रतिनिधी असणार आहे. या समितीच्या कामकाजाची जबाबदारी क्रीडा विभागाकडे असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)