जर्मन बेकरी प्रकरण : भटकळच्या जामिनावर 24 ऑक्‍टोबर रोजी सुनावणी

पुणे – कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्स्फोटात प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याच्या जामिनावर विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात दि. 24 ऑक्‍टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

तब्बल 72 सुनावण्यांना न्यायालयात हजर न केल्याने भटकळ याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 73 व्या सुनावणीला विशेष सरकारी वकील आणि तपास अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याचा अर्ज दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यामुळे पुढील तारीख देण्यात आली आहे.

13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्ती मृत्युमुखी, तर एकूण 56 लोक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये 5 आणि जखमींमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, एटीएसने केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या स्फोटामध्ये आरडीएक्‍स या स्फोटकाचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन बेकरी या गुन्ह्याच्या ठिकाणी यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा केल्यापासून तो फरारी होता.

इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांनी संयुक्तपणे कारवाई करताना यासिनला नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक केली होती. त्याचा ताबा दि.13 मार्च 2014 रोजी एटीएसकडे सोपविल्यानंतर त्याला याप्रकरणी 14 मार्च 2014 रोजी पुणे येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 72 सुनावण्यांना उपस्थित करण्यात न आल्याने तसेच त्यांच्या हक्कावर गदा येत असल्याने त्याने अॅड. जहिरखान पठाण यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवारी (दि.12) सरकारी पक्षाचा युक्तीवाद होणार होता. मात्र, विशेष सरकारी वकील आणि तपास अधिकारी दोघेही उपस्थित न राहिल्याने पुढील तारीख पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)