जयवंत शुगर्स 7 लाख टन ऊसाचे गाळप करणार

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन; 8 व्या गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ 

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) – धावरवाडी, ता. कराड येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याच्या 8 व्या गळीत हंगामाला गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यंदाच्या गळीत हंगामात जयवंत शुगर्स 7 लाख टन ऊस गाळप करेल, असा विश्वास जयवंत शुगर्स चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जयवंत शुगर्स चे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, पैलवान शिवाजीराव जाधव, जितेंद्र पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीष पाटील, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, जयवंत शुगर्सच्या उभारणीमध्ये धावरवाडी, चोरे, मरळी यासह आसपासच्या सर्वच गावांतील लोकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी हित जोपासत केलेल्या अचूक नियोजनामुळे गेल्या 8 वर्षात शेतकरी सभासदांमध्ये जयवंत शुगर्सची विश्वासार्हता वाढली आहे. 13.04 ही सर्वोच्च रिकव्हरी देखिल जयवंत शुगर्सनेच प्राप्त केली आहे. त्यामुळे आजही अनेक शेतकरी आपला ऊस जयवंत शुगर्सलाच घालविण्यासाठी आग्रही असतात.

साखरेच्या दराबाबत भाष्य करताना ते म्हणाले, शेतकर्‍यांना अधिक दर मिळावा. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. गेल्यावर्षी जो दर निश्चित करण्यात आला होता, त्यातील फरक रक्कम येत्या काळात निश्चित दिली जाणार असल्याने, शेतकर्‍यांनी निश्चिंत राहावे. साखरेचा विक्री दर जास्त राहिला तर साखर कारखानदारांनाही जास्त दर देणे शक्य होते. यासाठीच साखरेचा विक्री दर 3100 ते 3200 रुपयांपर्यंत करावा, अशी मागणी सरकारकडे केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत अनुकुलता दर्शविली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सकारात्मक धोरणांचा आढावा घेताना नामदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, साखर उद्योगाकडे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे विशेष लक्ष आहे. बफर स्टॉक, इथेनॉलसाठी कमी व्याजदराने कर्ज, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय असे अनेक सकारात्मक निर्णय सरकारने घेतले आहेत. इथेनॉल निर्मितीला मोदी सरकारने प्राधान्य दिले असून, त्यासाठी 6000 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जयवंत शुगर्समुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली असून भाजपा सरकारच्या माध्यमातून रस्त्याची अनेक कामेही मार्गी लागली आहेत.

जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. पोपटराव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. चोरे गावचे माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, तातोबा थोरात, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप थोरात, संग्राम पाटील, मुकुंद चरेगावकर, पैलवान आनंदराव मोहिते, पैलवान धनाजी पाटील, गजेंद्र पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक जाधव, दाजी जमाले, प्रताप पाटील, इंदोलीचे सरपंच संदीप निकम, मोहनराव मोहिते यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिस्टलरीचे काम पूर्णत्वाकडे

जयवंत शुगर्सने डिस्टलरी उभारणीस प्रारंभ केला असून हे काम जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण होईल. या डिस्टलरीमुळे स्थिर भावाने शेतकर्‍यांना पैसे देण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)