जम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचाली 

पीडीपी, कॉंग्रेसमध्ये हातमिळवणी होण्याचे संकेत

श्रीनगर – राज्यपाल राजवट लागू असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या संकेतांनुसार, पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) आणि कॉंग्रेसमध्ये सरकार स्थापनेसाठी हातमिळवणी होईल. तर नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) हा पक्ष सरकारला बाहेरून पाठिंबा देईल.

जम्मू-काश्‍मीरमध्ये याआधी पीडीपी-भाजप युतीचे सरकार होते. मात्र, चालू वर्षी 16 जूनला भाजप युतीमधून बाहेर पडल्याने पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. तिची सहा महिन्यांची मुदत 19 डिसेंबरला समाप्त होईल. मात्र, त्यानंतर 87 सदस्यीय विधानसभा विसर्जित न करता त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

-Ads-

त्यामुळे सज्जाद लोन यांच्या पीपल कॉन्फरन्सला पाठिंबा देऊन त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अर्थात, भाजपचे 25 तर पीपल कॉन्फरन्सचे केवळ 2 आमदार आहेत. त्यामुळे पीपल्स कॉन्फरन्स आणि भाजप युती बहुमतासाठी आवश्‍यक 44 हा आकडा गाठू शकत नाही. तो गाठण्यासाठी बंडखोरीने ग्रासलेल्या पीडीपीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल,अशी चर्चा आहे.

यापार्श्‍वभूमीवर, भाजपच्या पाठिंब्याने आणखी एक सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना शह देण्यासाठी पीडीपी, कॉंग्रेस आणि एनसी हे पक्ष एकत्र येण्याची शक्‍यता बळावली आहे. त्या तिन्ही पक्षांनी सरकार स्थापनेच्या हालचालींना पुष्टी दिली आहे. ते खरोखरीच एकत्र आल्यास जम्मू-काश्‍मीरात नवी राजकीय फेरजुळणी पहावयास मिळेल.

पीडीपी आणि एनसी हे पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी एकत्र येण्याचे मन बनवल्याचे दिसते. पीडीपीचे 28, एनसीचे 15 तर कॉंग्रेसचे 12 आमदार आहेत. ते तीन पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहजपणे पार होऊ शकतो. अर्थात, त्यांचे सरकार स्थापन झाल्यास मेहबुबा पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास उत्सुक नाहीत. त्यांच्याऐवजी पीडीपीच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले जाईल, अशी चर्चा आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)