जम्मू-काश्‍मिरात पर्यटनाला चालना

     वर्तमान

  श्रीकांत नारायण

जम्मू-काश्‍मीरमध्ये पर्यटन व्यवसायाला नव्याने चालना मिळण्यासाठी आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाला पुष्टी मिळण्यासाठीच राज्य सरकारने अतिरेकी कारवायांविरुद्धच्या मोहिमेला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. म्हणूनच तो निर्णय स्वागतार्ह आहे, असेच म्हटले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर आणि नोटाबंदीच्या काळानंतर थंडावलेल्या अतिरेकी कारवाया आता जम्मू-काश्‍मीरमध्ये पुन्हा वाढल्या असून त्यामुळे काश्‍मीरचे खोरे अशांत बनले आहे. पाकिस्तानी सरकारचा तसा छुपा पाठिंबा असणाऱ्या अतिरेक्‍यांना राज्यात शांतता नको आहे. म्हणूनच केंद्रातील सरकार अस्थिर व्हावे, या हेतूनेच या अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत, हे उघडच आहे. मोदी सरकारनेही “सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकिस्तानला मुहतोड जबाब दिला होताच; शिवाय खुद्द काश्‍मीरमधील अतिरेकी संघटनांना मिळणाऱ्या सर्वप्रकारच्या मदतीला चांगलाच चाप लावला आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये पोलीस, निमलष्करी दल आणि लष्कराच्या मदतीने अतिरेकी कारवायांना आळा घालण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र दुर्दैवाने तेथील नागरिकांची पाहिजे तशी साथ नसल्यामुळे त्यांना बदनामीचा सामना करावा लागत आहे. अतिरेकी कारवायांविरुद्धच्या लढाईत जर तेथील नागरिकांचे सहकार्य मिळाले तर काश्‍मीर खोऱ्यात शांतता नांदण्यास फार वेळ लागणार नाही. मात्र, राज्य सरकार आणि नागरिक यांच्यात सुसंवाद नसल्यामुळे अतिरेक्‍यांना फावते आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्‍मीर सरकारने, श्रीनगरमध्ये तब्बल 30 वर्षांनी होणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ इंडिया (“ताई’) च्या 64 व्या वार्षिक अधिवेशनाचे निमित्त साधून पोलीस आणि निमलष्करी दलाने सुरु केलेल्या अतिरेकी कारवायांविरुद्धच्या मोहिमेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्‍मीर सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. अतिरेकी कारवायांविरुद्धच्या मोहिमेला स्थगिती देण्याचा निर्णय विद्यमान राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, बुधवारपासून सुरू झालेल्या “ताई’च्या अधिवेशनाला देशभरातून 500 प्रतिनिधी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

वास्तविक गेल्या दोन वर्षात काश्‍मीर खोऱ्यात, संप, निदर्शने, दगडफेक, हरताळ, गोळीबार, संचारबंदी अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावत चालली होती. त्या पार्श्‍वभूमीवर. पर्यटकांना पुन्हा आकर्षित करून घेण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्‌सचे अधिवेशन हे चांगले निमित्त आहे, हे लक्षात घेऊन राज्यसरकारने हा स्तुत्य निर्णय घेतला, ही मोठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. या निर्णयामुळे अधिवेशनकाळात तरी श्रीनगरमध्ये शांतता नांदू शकेल. विशेष म्हणजे, तब्बल 30 वर्षांनंतर श्रीनगरला हे अधिवेशन भरले आहे. भारतात पर्यटनाच्या दृष्टीने जम्मू-काश्‍मीरचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांना काश्‍मीरमध्ये नेण्यास पर्यटन संस्था उत्सुक असतात.

मात्र गेल्या काही वर्षांपासून कोणताही धोका पत्करण्याची तयारी नको म्हणून काश्‍मीरमध्ये जाण्यास पर्यटक उत्सुक नसतात. खरे तर, पर्यटन हाच काश्‍मीरचा एक प्रमुख व्यवसाय आहे. तेथील असंख्य तरुणांचे रोजगार पर्यटनावरच अवलंबून आहेत. त्यामुळे तेथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले, तरच या तरुणांचा उदरनिर्वाह चांगल्याप्रकारे होऊ शकतो. मात्र, पर्यटनाला वाव असूनही पर्यटक येत नसल्याने असंख्य तरुणांची रोजी-रोटी बुडत असल्यामुळे त्यांच्यात वैफल्याची भावना निर्माण होत आहे. तरुणांमधील हीच वैफल्याची भावना राज्यातील अशांततेस कारणीभूत ठरल्याचे अनेकदा दिसूनही आले आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारच्या मदतीने अतिरेक्‍यांविरुद्धची मोहीम तीव्र केली असून आतापर्यंत “जैश-ए-मोहम्मद’ संघटनेच्या प्रमुखासह अनेक अतिरेक्‍यांना कंठस्नान घातले आहे. मात्र, तरीही काश्‍मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया चालूच असून पोलीस आणि निमलष्करी दलाविरुद्ध नाराज असलेल्या नागरिकांची त्यांना साथ मिळत आहे. खोऱ्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी तेथे सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. हे शांतता आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण झाल्यास पर्यटकही उत्साहाने काश्‍मीरला जातील आणि तेथील पर्यटन उद्योगास पुन्हा चांगले दिवस येतील. त्यासाठीच ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिवेशनाचे निमित्त साधून राज्य सरकारने अतिरेकी कारवायांविरुद्धच्या मोहिमेला स्थगिती दिली आहे. काश्‍मीर खोऱ्यात शांतता आणि सौहार्दाचं वातावरण निर्मितीच्या दृष्टीने ते एक चांगले पाऊल ठरेल, अशीच आशा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)