जमीन फेरफार नोंदी भाग 1(कायदाविश्व)

जमीन व्यवहार आणि त्यामधील फेरफार यामधील गुंतागुंत हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 7-12 उतारा, त्यावरील नोंदी, त्यांचे अर्थ, इनामी जमिनी, 32-ग ची प्रकरणे अर्थात कूळकायाद्याचे स्पष्टीकरण, वतन जमिनी, देवस्थान जमिनी, वारसनोंदी अशा असंख्य गोष्टींमुळे प्रत्येकाला कधी ना कधी कायदेशीर तरतुदींचा आधार घ्यायची वेळ येतेच. महसूल कायद्यातील अनुभवी आणि तज्ज्ञ शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजय कुंडेटकर हे खास प्रभातच्या वाचकांसाठी हे सदर लिहीत आहेत. जमिनी व्यवहारातल्या शंका आणि त्याचे कायद्याला धरून असलेले उत्तर या धर्तीवर वाचकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

फेरफार नोंदींबाबत महत्त्वाचे –
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 154 अन्वये, नोंदणी अधिकाऱ्याने पाठविलेली जमीन हस्तांतरणाची माहिती वगळता, शेत जमिनीत कायदेशीर दस्ताद्वारे कोणत्याही प्रकारचा हक्क संपादन करणाऱ्या व्यक्तीने त्याबाबतची माहिती (वारस इत्यादी), तीन महिन्यांच्या आत तलाठ्यांतना कळविणे आवश्‍यक आहे. (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149). अन्यथा हक्क संपादन करणारा दंडास पात्र ठरतो (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 152).

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 150 (2) मधील दुरुस्ती:
सन 2014 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक-30 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, च्या कलम 150 च्या पोटकलम (2) मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली आहे. जेथे साठवणुकीच्या यंत्राचा (संगणक इत्यादी) वापर करून, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 148 क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील तेथे तालुक्‍यातील तहसीलदार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 154 अन्वये सूचना मिळाल्यानंतर लगेचच ती सूचना फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून किंवा फेरफार नोंदवहीवरून त्यास दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याबरोबर गावाच्या संबंधित तलाठ्यास लघुसंदेश सेवा (एस.एम.एस.) किंवा इलेक्‍ट्रॉनिक मेल (इ-मेल) किंवा विहीत करण्यात येईल अशा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे पाठवील. अशी माहिती मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने त्याची नोंद फेरफार नोंदवहीत करील; परंतु असे की, भारतीय नोंदणी अधिनियम 1908 अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्याच अधिकाऱ्यासमोर ज्या व्यक्तींनी स्वत: दस्तऐवज निष्पादीत केले असतील, अशा व्यक्तींना तहसीलदार कार्यालयातील तलाठ्याद्वारे पहिल्या परंतुकान्वये तरतूद केलेली अशी कोणतीही सूचना पाठविणे आवश्‍यक असणार नाही.

कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत…
1. नोंदणीकृत दस्ताने,
2. वारस तरतुदींन्वये आणि
3. न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानेच बदल होतो. इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही हे लक्षात ठेवावे.
सात-बारा सदरी कोणताही बदल फेरफार नोंदविल्याशिवाय आणि फेरफार प्रमाणित झाल्याअशिवाय होत नाही. फक्त अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता वर्दीवरून अज्ञानाच्या पालकाचे नाव कमी करता येते. तथापि, यासाठीही फेरफार घालणे सुरक्षित असेल.
स्थानिक चौकशी : म्हणजे वर्दी मिळाल्यानंतर, वर्दीची खातरजमा करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींकडे करण्यात येणारी चौकशी.

– डॉ. संजय कुंडेटकर
(लेखक उपजिल्हाधिकारी आहेत) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)