जमीन कब्जेपट्टीसाठी पुन्हा आमरण उपोषण

वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा बाळकृष्ण पाटील यांचा इशारा

कराड – मलकापूर येथील सर्व्हे नंबर 144 अ/1 मधील बाळकृष्ण विष्णू तथा तात्या पाटील यांची जमीन ताब्यात मिळावे म्हणून सुरू असलेले आमरण उपोषण सोडण्यासाठी प्रातांधिकारी हिम्मत खराडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने भूमी अभिलेख अधीक्षक शिंदे यांनी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या मुदतीत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून याबाबतचा लेखी आहवाल न्यायालयात देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात 30 नोव्हेंबर पर्यंत पाटील यांना जमीनीची कब्जेपट्टी न देता उलट न्यायालयात खोटा व दिशाभूल करणार अहवाल सादर करून न्यायालय व पाटील यांची दिशाभूल केली आहे. या विरोधात जमीन कब्जेपट्टीसाठी पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करून वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

पाटील म्हणाले, मलकापूर येथील जुना सर्व्हे नंबर 571 नवीन 144 अ/1 असा झाला आहे. त्यामुळे जुना 571 व नवीन 144 अ/1 हे दोन्हीही सर्व्हे नंबर एकाच क्षेत्राचे आहेत. या सर्व्हे नंबर मधून कराड ढेबेवाडी हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता झाल्यानंतर 144 अ/1 मधील वहिवाटीवरून वाद उत्पन्न झाला होता. या वादातून कराड येथील जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.

या दाव्याच्या निकालात बाळकृष्ण पाटील यांच्या मालकीचे 27 आर क्षेत्र सिटी सर्व्हे कार्यालयाच्या मार्फत त्यांना मोजून हद्द निश्‍चित करून देण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले होते. त्यानुसार सिटीसर्व्हे कार्यालयाच्यावतीने संबंधित सर्व्हे नंबर मधील क्षेत्राची मोजणी करण्यात आली. मात्र कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून अद्यापही न्यायालयाच्या आदेशानुसार हद्द निश्‍चित करून देण्यात आलेल्या नाहीत. ही हद्द निश्‍चित करून देण्यात कोणाची तरी हित अडसर ठरत असल्यामुळे सिटी सर्व्हे विभाग हाती निश्‍चित करून देण्यास असमर्थता दर्शवत आहेत.

कोणाची तरी हित जोपासण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मी या जागेचे शासनाने असलेले सर्व प्रकारचे कर नियमित भरत असून मला याचा ताबा अद्याप मिळालेला नाही. माझ्या जागेत खासगी व्यक्तीकडून सार्वजनिक उपक्रमासाठी दांडगाव्याने आठ फूट उंच व सुमारे दोनशे फूट लांब भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे सिटी सर्व्हे विभाग अतिक्रमणे काढण्यास हेतू पुरस्सर टाळाटाळ करत आहे.

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कोणाच्या तरी हितासाठी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या मनमानी कारभार करणाऱ्या सिटी सर्व्हे विभागाविरोधात मी 1 नोव्हेंबर 2018 पासून कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणा दरम्यान, पाचव्या दिवशी प्रातांधिकारी हिम्मत खराडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने भूमी अभिलेख अधीक्षक शिंदे यांनी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंतच्या मुदतीत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून याबाबतचा लेखी आहवाल न्यायालयात देणार असल्याचे लेखी आश्वासन देत उपोषण सोडण्यासाठी भाग पाडले होते. मात्र, त्यांनी माझा विश्वासघात केला.

दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न करता केवळ जमीन मोजणीचा फार्स करून खोटा व दिशाभूल करणारा अहवाल शिंदे यांनी न्यायालयासमोर मांडून न्यायालयाची व माझी फसवणूक करून माझी जमीन हडपण्याच्या षडयंत्रात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

तरी याबाबत मी त्यांच्यावर न्यायालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. याशिवाय माझ्या न्याय्य हक्काचा लढा पुन्हा सुरू करणार आहे. येत्या दहा दिवसात संबंधितांनी माझ्या जमीनीचे कब्जेपट्टी न दिल्यास मी पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. वेळ पडल्यास आत्मदहनही करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)