जबाबदारी सरकारचीच

तथाकथित साधू बाबा रामरहीम याला बलात्काराबद्दल दोषी ठरवल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यात झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार असल्याची टिपणी न्यायालयाने केल्याने, आता मोदी सरकारला आणि खट्टर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. बाबा रामरहिमला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने त्यानंतर अशाच हिंसेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी दोन्ही सरकाराना घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पुन्हा तसे होणे कोणालाही परवडणारे नाही. पंजाब आणि हरयाणात जे काही झाले ते सारे पूर्वनियोजित असल्याचेही समोर येत आहे समर्थकांना हिंसाचारासाठी भडकावण्याचे काम बाबांच्या 5 प्रमुख अनुयायींने केले. ते बाबा रामरहिमच्या अगदी जवळचे मानले जात आहेत. बाबाच्या समर्थकांना बोलावण्यासाठी त्यांना चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.

बाबा मुक्त झाल्यानंतर काय करणार आणि बाबा दोषी ठरवल्यानंतर काय करावे याचे पूर्ण नियोजन करण्यात आले होते. डेरा प्रमुख स्वच्छता मोहिम आणि तीन दिवसीय सत्संग करणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला 500 रुपये आणि जेवणासाठी अतिरिक्त 500 रुपये दिले जातील, असेही सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे बाबाच्या समर्थकांनी आधीपासूनच येताना आपल्या पिशव्या आणि बॅगांमध्ये दगड-गोटे भरून आणले होते. त्यापैकी काही विटा घेऊन तयार बसले होते. प्रकरण तापताच त्यांनी लष्करी जवानांवर तूफान दगडफेक सुरू केली. हिंसाचाराने टोक गाठले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यावरूनच सरकार आणि बाबा यांची मिलीभगत लक्षात येते रात्रीपासूनच पंचकुला येथे जमलेल्या सर्व भक्तांना बाहेर काढले जाईल असे सांगण्यात आले होते.

मात्र, असे काहीच झाले नाही. बाबाच्या गुंडांनी माध्यमांच्या ओबी व्हॅनला आग लावली. आणि नंतर दिसेल त्या वाहनाला आग लावली. एवढेच नव्हे, तर बाबाच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला केला. तेव्हासुद्धा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. बाबाचे समर्थक असे नियोजित पद्धतीने हिंसक झाले तरी सरकारने काहीच केले नाही, याला निश्‍चितच काही करणे आहेत. एक तर पंजाब आणि हरियाणात रामरहिमचे 50 लाखांहून अधिक समर्थक आहेत. हरियाणातील नऊ जिल्ह्यांमध्ये 30 विधानसभा जागांवर बाबांचे प्रभुत्व आहे. गेल्या निवडणुकीत बाबाने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपाला 12 जागा मिळवता आल्या. यापूर्वी बाबाने इंडियन नॅशनल लोकदल आणि कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आता हा बाबा भाजप समर्थक झाल्याने भाजप सरकारला या मैत्रीला जागणे भाग होते. मुख्य म्हणजे ही मैत्री काही लपून राहिलेली नाही. हरियाणाचे शिक्षण मंत्री राम विलास शर्मा यांनी राम रहीमच्या जन्मदिनी 51 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याशिवाय रुमाल स्पर्श स्पर्धेला प्राधान्य देण्यासाठी क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी 50 लाख आणि राज्यमंत्री मनीष ग्रोवर यांनी या खेळासाठी 11 लाखांच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही मैदानासाठी 30 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर, हरियाणा सरकारचे निष्क्रिय राहणे समजून घेण्यासारखे आहे. पण त्यांच्या या निष्क्रियतेमुळेच अनेकांचा बळी गेला आहे आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.म्हणूनच आता न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे, हे सारे नुकसान बाबाकडून भरून घेण्याची गरज आहे. बाबाची संपत्ती काही थोडी नाही. डेरा सच्चा सौदाचे जुने भवन आणि एसी मार्केट आहे. डेराचे नवीन भवन सुद्धा आहे.

त्यामध्ये सतनाम सिंग बॉईज स्कूल, शाह सतनाम सिंग गर्ल्स स्कूल, शाह सतनाम सिंग गर्ल्स कॉलेज, शाह सतनाम सिंग बॉईज कॉलेज, क्रिकेट स्टेडियम, पंचतारांकित हॉटेल, बाबांची गुफा, एमएसजी इंटरनॅशनल स्कूल, शाह सतनाम सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल अनेक कारखाने, एमएसजी प्रॉडक्‍ट्‌स, फिल्म सिटी सेंटर, माही सिनेमा, कशिश रेस्टॉरंट आणि ऑर्गेनिक शेती, बाग अशी अब्जावधी रुपयांची मालमत्ता बाबाच्या नावावर आहे. ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहेच; पण आता तेवढ्यावरच थांबून चालणार नाही या मालमत्तेचा लिलाव करून दंगलबाधितांना भरपाई द्यायला हवी.

एकूणच या प्रकरणात सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. आज सोमवारी तर सरकारला आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागणार आहे. कारण बाबाला दोषी ठरवण्यात आल्याने आज त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. बाबाच्या विरुद्ध असलेले पुरावे पाहता त्याला किमान सात वर्षांची कैद होऊ शकते किंवा जन्मठेपसुद्धा होऊ शकते. शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर पुन्हा हिंसेचा आगडोंब उसळला, तर पोलीस आणि सरकार याना कोणीही माफ करणार नाही. साध्या साध्या आंदोलनात बळाचा आणि गोळीबाराचा वापर करणाऱ्या पोलिसांना आता आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवता येणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणा याना आपली जबाबदारी ओळखावीच लागेल.

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला जर जबाबदारी सरकारचीच असेल व ह्या सरकारात वरील देणग्या देणाऱयांचा विचारकरता ह्या बाबांचेच भक्त असतील तर हे सरकार आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडेल ह्याची शक्यता काय ? तेव्हा न्यायव्यवस्थेनेच आपल्या अधिकारात हि जबाबदारी पार पाडणे हि काळाची गरज ठरते त्याच बरोबर ह्या सरकारातील ह्या बाबांचे जे भक्तगण आहेत त्यांची सुद्धा जाहीररीत्या न्यायालयीन चवकशी करणे आवश्यक्य आहे व त्यानांसुद्धा शिक्षा व्हावयास पाहिजे तरच भविश्श्यात नव्याने निर्माण होणाऱ्या अशा बाबांना पायबंद बसेल असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)