जबाबदारी घेऊनही आ. जगतापांना पक्षाकडून अभय

शहरात पुन्हा एकदा राजकीय भूकंप । राष्ट्रवादी एवढी मोठी कारवाई पहिल्यांदाच । नगरसेवकांची आज निर्णायक बैठक

नगर – भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय माझा असल्याची जाहीरपणे कबुली देवून देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने आ. संग्राम जगताप यांना अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात नगरसेवकांसह शहरजिल्हाध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे अ. जगताप यांचा संबंध नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही राजकीय भूकंप सुरू राहिले असून आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या 18 नगरसेवकांसह शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांची पक्षातून हकालपट्टी करून पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीत पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद नगर शहरात आगमी काळात असे उमटणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या नगरसेवकांची उद्या सकाळी महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्याने निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेचा सोपान चढविण्यासाठी वेगवेगळे आराखडे बांधण्यात येत होते. सर्वाधिक जागा 24 जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने महापौरपदावर दावा केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 18, भाजपचे 14, कॉंग्रेस 4, बसपचे 4, सपा 1 व अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल होते. परंतू शिवसेना व भाजप युतीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. त्यात राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती. परंतू राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला विरोध केला होता. स्थानिक पातळीवर हा निर्णय असला तरी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेवून नये, असे स्पष्ट आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते.

जातीयवादी पक्षांना पाठिंबा न देण्याचे आदेश देवून देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबाच दिला नाही तर महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीत मतदान देखील केले. महापौर निवडीच्या दिवशीच राष्ट्रवादीच्या 19 व शहरजिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांना कारणे दाखवा नोटीस थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बजावली होती. या सर्वांना सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार या नगरसेवकांकडून प्रदेशाध्यक्षांकडे खुलासा पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याबरोबर आमदार संग्राम जगताप यांनी या सर्व प्रकरणाला मी जबाबदार असल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच केडगाव दुहेरी हत्याकांडा प्रकरणातून शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली मानहाणीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे नगरसेवकांसह आ. जगताप यांनी स्पष्ट केले होते.

नगरसेवकांनी खुलासा पाठविला असतांनाही प्रदेशाध्यक्षांनी खुलास न केल्यामुळे पक्षशिस्त भंगाची कारवाई करून पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, नगरसेवकांसह विधाते यांच्यावर पक्षाने थेट हकालपट्टीची कारवाई केली असतांना आ. जगताप यांनी स्वत: या पाठिंब्याची जबाबदारी घेतली असतांनाही त्यांना मात्र पक्षाने अभय दिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची शहरात पहिली घटना आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या नगरसेवकांनी उद्या सकाळी बैठक होत आहे. त्यात ते काय निर्णय घेतात याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रदेश कार्यालयाकडे खुलासा सादर केलेला आहे. यावर देखील कारवाई झालेली आहे. निलंबित नगरसेवक उद्या (रविवारी) बैठक घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर निर्णयाक भूमिका मांडणार आहोत.
– संपत बारस्कर
गटनेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस

प्रदेशाध्यक्षांनी कारवाई केल्याचे पत्र मिळाले आहे. माझ्यासह नगरसेवकांवर देखील कारवाई झाली आहे. आम्ही सर्व एकत्र येऊन आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्याकडे भूमिका मांडणार आहे. स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून पक्षनेतृत्वासमोर भूमिका मांडू.

– प्रा.माणिकराव विधाते
शहरजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

पक्ष कुणालाही माफ करणार नाही. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना भाजपला मतदान करायला भाग पाडणाऱ्यांवर देखील कारवाई कठोर कारवाई होणार आहे. नरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष यांना लेखी खुलासा देणे अपेक्षित होते. त्याद्वारे त्यांच्या निर्णयाला कोण जबाबदार आहे? ही बाब समोर आली असती. मात्र, सात दिवस आणि दोन दिवसांची वाढीव मुदत देऊनही नगरसेवकांचा खुलासा प्रदेशाध्यक्षाकडे पोहोचला नाही. त्यामुळे ही कारवाई अपेक्षितच होती.
– राजेंद्र फाळके
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला दिलेला पाठिंबाबाबत पक्ष नेतृत्वाशी समक्ष चर्चा झालेली नाही. एवढी मोठी कारवाई होईल, हे अपेक्षित नव्हते. तरी देखील त्याची जाणिव होती. पक्ष नेतृत्व आणि पक्षाच्या वरिष्ठांशी भेटून नगरसेवकांची बाजू आणि भूमिका मांडणार आहे. आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, आणि राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते म्हणून नगर शहराच्या विकासाच्या मुद्यावर काम करत राहू. नगरसेवक पक्ष कारवाईवर काय भूमिका मांडतात याकडे आपले लक्ष आहे. नगरसेवकांची भूमिका लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वासमोर योग्य ती बाजू मांडणार आहोत. यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहोत.
– आमदार संग्राम जगताप
राष्ट्रवादी कॉंग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)