जप्त केलेली जनावरे परत देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

सातारा, दि. 20(प्रतिनिधी) – पोलिसांनी जप्त केलेली 55 जनावरे ताब्यात देण्याचा पुण्याचे शरीफ कुरेशी यांचा अर्ज मंगळवारी सातारा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे ही जनावरे पुन्हा गो-शाळेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दि. 23 मे रोजी सातारा शहरातील सदरबझार कत्तल खान्याजवळ कृषी गो-सेवा संघाचे क्रियाशील सदस्य शिवशंकर स्वामी यांनी 55 जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर छापा मारला होता. सातारा शहर पोलिसांनी 55 रेडकू जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फलटण येथील जैन समाज संचलित गोशाळेच्या ताब्यात देण्यात आली होती. ती 55 जनावरे आपल्या मालकीची असून जनावरांच्या विक्रीसाठीच कोल्हापुर जिल्ह्यातून खरेदी केली होती असा दावा पुणे येथील खाटीक समाजातील शरीफ हैदरसाब कुरेशी यांनी केलला होता. मालक या नात्याने जनावरे ताब्यात देण्याचा अर्ज त्यांनी सातारा न्यायालयात दाखल केला होता. या अर्जाला स्वामी आणि फलटणच्या गोशाळेने जोरदार विरोध केला.

कुरेशी यांच्या अर्जाची सुनावणी सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी बा.सि. खराडे यांच्या समोर झाली. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. दोन बंदिस्त वाहनांमध्ये अत्यंत निर्दयतेने ही जनावरे कोंबण्यात आली होती. आर.टी.ओ. परवाना आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या दाखल्याने अवघ्या सहा जनावरांची वाहतुक करण्यास परवानगी आहे. कुरेशी हा पुणे येथील मांसविक्रेता असून त्याचा पुणे महानगरपालिकेतील पुरावा स्वामी यांनी न्यायालयासमोर सादर केला. या युक्‍तिवादाची दखल घेऊन कुरेशी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. जैन गोशाळेच्या वतीने ऍड. मुकुंद सारडा यांनी काम पाहिले. व सरकारी पक्षाच्या वतीने सहा.सरकारी वकील ऍड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)