जप्तीची स्थगिती उठवा अन्यथा घेराव

खा.राजू शेट्टींचा सहकार मंत्र्यांना इशारा
सातारा, प्रतिनिधी- मागील हंगामातील ऊसाची बिले न देणाऱ्या कारखान्यांवर साखरआयुक्तांनी जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची 346 कोटी रूपये थकले असून सहकारमंत्र्यांनी जप्तीची स्थगिती उठवून तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अन्यथा पुढील आठवड्यापासून सहकारमंत्र्यांच्या मागे आम्हाला लागावे लागेल व राज्यात जेथे फिरतील त्या ठीकाणी घेराव घातला जाईल, असा इशारा खा.राजू शेट्टी यांनी दिला.
साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना खा.शेट्टी म्हणाले, दूध दरासाठी आणि ऊसाच्या थकीत रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानीने मागील महिन्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर दुधाचे आंदोलन तीव्र केल्यानंतर 5 रूपये अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यानंतर ऊसाच्या थकीत रक्कमा ठेवलेल्या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली. मात्र, सहकारमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली. वास्तविक बाजारपेठेत साखरेचे दर 3 हजारांच्या पुढे गेले होते त्यामुळे बॅंकांनी देखील साखरेच्या पोत्यांचे मुल्यांकन ही वाढवून अतिरिक्त कर्ज देण्याची तयारी दर्शविली होती. असे असताना राज्यात 346 कोटी रूपये देणे कारखान्यांनी दिले नाही. त्यापैकी 186 कोटी रूपये सोलापुर जिल्ह्यातील असून त्यामध्ये सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांची 10 कोटी रूपयांची देणे बाकी ठेवले आहे. एकूणच सहकारमंत्र्याची भूमिका म्हणजे दरोडेखोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्याप्रमाणे आहे. तसेच कारखान्यांच्या जप्तीला स्थगिती देण्याच्या प्रक्रियेमागे राजकीय अर्थ व भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप खा.राजू शेट्टी यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकांविषयी बोलताना खा.शेट्टी म्हणाले, राज्यातील कोल्हापुर, सांगली, हातकणंगले, माढा, बुलढाणा व वर्धा या मतदारसंघात आम्ही निवडणूक लढविणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना माढा अथवा बुलढाणा मतदारसंघातून उतरविण्याची तयारी सुरू आहे. तर हातकणंगले मतदारसंघातून परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे हे भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याबाबत खा.शेट्टी म्हणाले, दहा वर्षापुर्वी आपण आमदार असताना परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी लोकसभा लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. लोकसभेत अभ्यासू नेतृत्व गेले पाहिजे अशी अपेक्षा आपण त्यावेळी व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या पत्नींनी निवडूण येण्याची गॅरंटी काय, अशी विचारणा आपल्याकडे केली होती. खरे निवडणूकीत निवडून येण्याची गॅरंटी कोणीच देवू शकत नाही. माझ्याविरोधात कोण तरी एक जण लढणारच आहे. तसेच माझे विरोधक ही एवढ्या विशाल मनाचे नाहीत की ते मला बिनविरोध निवडून देतील असा टोला खा.शेट्टी यांनी लगावला.
मराठा आरक्षणा विषयी बोलताना खा.शेट्टी म्हणाले, देशातील सर्वच राज्यात शेती करणाऱ्या जातींना आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपण पुर्वीपासून मागणी करित आहोत. तर सांगली व जळगाव महापालिकेत भाजपला मिळालेल्या यश मिळण्यामागे सांगली व मिरज दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने त्या ठीकाणी त्यांना यश मिळाले असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले. त्याचबरोबर दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधानाच्या प्रती जाळण्याच्या घटनेचा निषेध खा.शेट्टी यांनी केला. यावेळी अर्जुन साळुंखे, अनिल पवार, अल्लाऊद्दीन इनामदार, शंकर शिंदे आदी.पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

..तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू
देशातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तसेच शेती उत्पन्न मालाला दिडपट हमी भाव मिळाला पाहिजे या मागणीचे अशासकीय विधेयक लोकसभेच्या अधिवेशनात मांडले आहे. विधेयकाला देशातील 22 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. भाजपने देखील विधेयकाला पाठिंबा देउन सर्वानुमते विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे असे खा.शेट्टी यांनी सांगितले. त्यावर भाजपने विधेयक मंजूर केले तर त्यांच्या सोबत पुन्हा जाणार का असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले देशातील शेतकरी कर्जमुक्त होणार असेल तर पुन्हा भाजपसोबत जाण्याचा विचार केला जाईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)