जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणय यांची विजयी सलामी

sindhu with pranay

टोकियो: भारताची जागतिक रौप्यपदक विजेती पुसारला सिंधू आणि अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना आज सुरू झालेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत विजयी सलामी दिली.

तसेच गुणवान पुरुष खेळाडू एच. एस. प्रणयनेही एकतर्फी विजयासह दुसरी फेरी गाठली. परंतु महिला एकेरीत वैष्णवी रेड्डीचे, तसेच मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

गेल्या महिन्यात पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत रौप्यपदक संपादन केले, तर सायना नेहवालने महिला एकेरीत कांस्यरदक पटकावून भारताला दुहेरी यश मिळवून दिले. मात्र आज जपान ओपनच्या पहिल्याच फेरीत सिंधूला कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. जपानच्या बिगरमानांकित सायाका ताकाहाशीने सिंधूला तीन गेम आणि 53 मिनिटांपर्यंत प्रखर झुंज दिली.

अखेर सिंधूने आपला अनुभव पणाला लावताना 21-17, 7-21, 21-13 अशी बाजी मारताना आगेकूच केली. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर चीनची बिगरमानांकित खेळाडू गाओ फॅंगजी हिचे आव्हान आहे. गाओने पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या नवोदित वैष्णवी रेड्डीचे आव्हान 21-10, 21-8 असे केवळ 28 मिनिटांत संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली.

पुरुष एकेरीत भारताच्या सातव्या मानांकित किदंबी श्रीकांतने हुआंग युशियांग याच्यावर 21-13, 21-15 अशी दणदणीत मात करताना विजया सलामी दिली. केवळ 33 मिनिटांत पहिल्या फेरीचा सामना जिंकणाऱ्या श्रीकांतला दुसऱ्या फेरीत हॉंगकॉंगच्या वोंग विंग की व्हिन्सेंटशी लढत द्यावी लागेल. वोंगने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हॅन्स ख्रिस्तियनचा 18-21, 21-17, 21-12 असा पराभव केला. पुरुष एकेरीतील आणखी एका पहिल्या फेरीच्या लढतीत भारताच्या एच. एस. प्रणयने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीचा 21-18, 21-17 असा 45 मिनिटांच्या झुंजीनंतर पराभव केला. दुसऱ्या फेरीत प्रणयला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाशी लढत द्यावी लागणार आहे.

दरम्यान थायलंडची युवा खेळाडू खोसित फेटप्रदाबने चीनच्या द्विताय मानांकित शि युकीचा 21-18, 24-22 असा 48 मिनिटे रंगलेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत पराभव करून सनसनाटी विजयाची नोंद केली. मात्र त्याच वेळी महिलांची अग्रमानांकित तेैपई चीनची तेई त्झु यिंग आणि पुरुष एकेरीतील अग्रमानांकित व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन या अग्रमानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमविताना विजयी सलामी दिली.

प्रणव चोप्रा-सिक्‍की रेड्डी दुसऱ्या फेरीत

सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या भारताच्या अव्वल जोडीला मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत निराशाजनक पराभव पत्करावा लागला. वांग यिलयू व हुआंग डोंगपिंग या द्वितीय मानांकित चिनी जोडीने भारतीय जोडीला 21-10, 21-19 असे 33 मिनिटांत पराभूत करीत विजयी सलामी दिली. मात्र त्याच वेळी प्रणव चोप्रा-सिक्‍की रेड्डी या बिगरमानांकित भारतीय जोडीने मात्र मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. प्रणव चोप्रा-सिक्‍की रेड्डी या बिगरमानांकित जोडीने मॅथ्यू फोगार्टी व इसाबेल जोंग या बिगरमानांकित अमेरिकन जोडीचा 21-9, 21-6 असा केवळ 22 मिनिटांत धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. प्रणव चोप्रा-सिक्‍की रेड्डी जोडीसमोर दुसऱ्या फेरीत चॅंग पेंग सून व गोह लियू यिंग या आणखी एका अमेरिकन जोडीचे आव्हान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)