जपानच्या नाओमीला अमेरिकन ओपनचे विजेतेपद

सेरेना विल्यम्सचा धक्‍कादायक एकतर्फी पराभव 
न्युयॉर्क, दि. 9 – ‘यूएस ओपन 2018’ च्या महिला एकेरीच्या अंतिम स्पर्धेत अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का बसला आहे. जपानच्या नाओमी ओसाकाने सेरेनावर मात करीत यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. नाओमीचे हे कारकिर्दीतील पहिले ग्रॅंड स्लॅम टायटल आहे.

आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-4 अशा फरकाने नाओमीने पराभव केला. नाओमी सेरेनाचा इतक्‍या सहजपणे पराभव करेल यावर कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता मात्र नाओमीने सेरेनाचा सरळ सेट मध्ये पराभव करताना आपले पहिले वाहिले ग्रॅंड स्लॅम पटकावले. ग्रॅंड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणारी नाओमी ओसाका (वय 20) ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेटचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. न्यूयॉर्कच्या अर्थर ऍश स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सेरेनाला ओसाकाने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला.

याआधी तिनं मार्च महिन्यात झालेल्या ‘मियामी ओपन’ स्पर्धेत तिच्यावर मात केली होती. सेरेना विल्यम्सची कारकिर्दीतील ‘यूएस ओपन’मधील नववी आणि ग्रॅंड स्लॅममधील 31 वी फायनल होती. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेनाला होती मात्र तिला यात यश आले नाही.

अंतिम सामन्याआधी सेरेनाविरुद्ध खेळण्याबद्दल प्रश्न विचारला असता नाओमीने, हा सामना कठीण जाणार आहे याची मला खात्री आहे. पण मला सेरेनाविरुद्ध खेळायचच आहे. ती मला प्रचंड आवडते. असं उत्तर दिलं होतं. प्रत्यक्ष सामन्यात सेरेनासमोर नाओमीचा निभाव लागेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता, मात्र सर्वांचे ठोकताळे खोटे ठरवत नाओमीने सेरेनाला धक्का देत आपल्या पहिल्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदावर मोहोर कोरली आहे.

नाओमी आणि सेरेना यांच्या वयामध्ये अंदाजे 16-17 वर्षाचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकिर्दीत 1999 साली पहिल्यांदा अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं, यावेळी नाओमी ही अवघ्या 1 वर्षाची होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात नाओमीने सेरेनाच्या अनुभवाचा आपल्या खेळावर अजिबात दबाव येऊ दिला नाही. सेरेनाच्या प्रत्येक फटक्‍यांना सफाईदारपणे उत्तर देत नाओमीने आपल्या पहिल्या वहिल्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)