जन्मदात्या आईकडूनच मुलीला मारण्याचा प्रयत्न

कोल्हापूर- अवघ्या एक दिवसाच्या मुलीला जन्मदात्या आईनेच घराच्या मागील जागेत पुरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरजवळील गांधीनगर येथे उघडकीस आला. संबंधित महिलेचे हे कृत्य शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने बाळाला वाचविण्यात यश आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, गांधीनगर येथील सारिका लखन मोरे (वय 26, मूळ रा. तासगाव, ता. मिरज, जि. सांगली) यांना सोमवारी मुलगी झाली. पण, मुलीचे ओठ फाटलेले असल्याने पती रागवेल या भीतीने सारिका हिने आज दुपारी मुलीला घराच्या मागील जागेत पुरण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लगेच लक्षात आल्याने त्यांनी आराडा-ओरडा केला आणि पोलिसांनाही बोलावले.

आईनेच जमिनीत पुरलेल्या मुलीला बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेजाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळाला वाचविण्यात यश आले आहे. या प्रकरणी सारिका मोरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या भीतीमुळेच हे कृत्य केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)