जनसंघर्ष यात्रेने पाथर्डीत कॉंग्रेसला नवसंजीवनी?

गलितगात्र कॉंग्रेसला डॉ. विखे यांच्यामुळे उभारी; आज दिग्गजांची उपस्थिती
पाथर्डी – कॉंग्रेस पक्षाने राज्यभर जनसंघर्षयात्रा काढून सरकारविरोधी धोरणाचा जनआक्रोश केला. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र तर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला. दुष्काळी परिस्थितीने होरपळत असलेल्या पाथर्डी तालुक्‍यात जनसंघर्ष यात्रेचा शहरात आज (दि. 9) सायंकाळी भव्य जाहीर सभेने समारोप होत आहे. जनसंघर्ष यात्रेची उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर होती.
नगर जिल्हा व त्यातही पाथर्डी तालुका हा कायम दुष्काळी असतो. दुष्काळ आणि पाथर्डी हे जणू समीकरणच बनलेले आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला न्याय देण्याच्या हेतूने डॉ. विखे यांच्या पुढाकाराने संघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डी तालुक्‍यात ठेवण्यात आला आहे. समारोपास संसदेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेत कॉंग्रेस पक्षाची राज्यातील सरकार विरोधी भूमिका स्पष्ट होणार असल्याने सत्ताधाऱ्यांचे लक्ष पाथर्डी तालुक्‍याकडे लागले आहे.
पाथर्डी तालुक्‍यात पूर्वी कॉंग्रेसची सत्ता होती. बहुतांश सहकारी संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात होत्या.
स्व. राजीव राजळे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर देशात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा कॉंग्रेस तालुक्‍यात नावापुरताच उरला होता. भाजप व राष्ट्रवादी हे तुल्यबळ तर कॉंग्रेस अस्तित्त्वहीन पक्ष अशी स्थिती झाली होती. तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, संभाजी वाघ, अरुण आठरे, नाशीर शेख, आलिम पटेल, पोपट बडे या हाडाच्या चिवट कार्यकर्त्यांनी एकाकी झुंज देत तालुक्‍यात कॉंग्रेस जिवंत ठेवली. डॉ. विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लक्ष घातल्यानंतर तालुक्‍यात कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, युवा नेते प्रतीक खेडकर, माजी सभापती काशिनाथ लवांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, पांडुरंग सोनटक्के, पांडुरंग हंडाळ, वसंत खेडकर, राजेंद्र नांगरे, लालाभाई शेख, बबनराव नरवडे, यमाजी भिसे, आप्पासाहेब बोरुडे, बबन सबलस, रामू आण्णा काकडे आदी दिग्गज डॉ. विखे यांच्याबरोबर कॉंग्रेसमध्ये आले. त्यामुळे कॉंग्रेसच्या जीवात जीव आला. जनसंघर्ष यात्रेची समारोप सभा गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक पाथर्डीत घेण्याचा निर्णय झाला अन्‌ अनेक वर्षांपासून मरगळ आलेल्या तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. अत्यंत संथ गतीने सुरू असलेला तालुक्‍यातील कॉंग्रेसचा प्रवास विखेंच्या सहयोगाने गतिमान झाला आहे. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त पाथर्डीत राज्यातील ज्येष्ठ नेते येत असल्याने पाथर्डीत पुन्हा कॉंग्रेसला गतवैभव मिळेल का, याची आता चर्चा चालू झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)