जनतेच्या भावना जाणतो तोच आदर्श राज्यकर्ता

थोर संत कबीर यांना पंतप्रधानांकडून आदरांजली


उत्तरप्रदेशात मगहूर येथे कबीर अकादमीचे भूमिपूजन

नवी दिल्ली – संत कबीर यांनी जातीची बंधने तोडत, सामान्य जनतेची, ग्रामीण भारताची भाषा वापरली. भारताच्या विविध भागात वेळोवेळी संतांचा उदय झाला, असे सांगून या संतांनी अनिष्ट प्रथा, रुढी यांच्यातून मुक्त होण्यासाठी समाजाला मार्ग दाखवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताच्या विविध भागातल्या संतांचा दाखला देतानच पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत बाबासाहेबांनी राज्यघटनेद्वारे भारताच्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा हक्क दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी आज उत्तरप्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यातल्या मगहूरला भेट दिली. थोर संत आणि कवी कबीर यांच्या 500 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी संत कबीर यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. संत कबीर यांच्या मझारवर त्यांनी चादर अर्पण केली. संत कबीर गुहेला पंतप्रधानांनी भेट दिली आणि संत कबीर अकादमीच्या भूमीपूजनानिमित्त एका कोनशिलेचे अनावरण केले. संत कबीर यांची शिकवण आणि विचार यांच्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे.

संत कबीर, गुरु नानक आणि बाबा गोरखनाथ यांच्यात अध्यात्मिक चर्चा रंगत असत अशा मगहूरच्या पवित्र भूमीवर थोर संत कबीर यांना आदरांजली अर्पण करण्याची आपली अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी एका जाहीर सभेत बोलतांना सांगितले.

24 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या संत कबीर अकादमीत संत कबीर यांचा वारसा जपण्याबरोबरच उत्तर प्रदेशातल्या प्रादेशिक बोली भाषा आणि लोककला जतन करण्यात येणार अहेत.

राजकीय संधीसाधुंवर जोरदार टीका करतानाच जो जनतेच्या भावना आणि दु:ख जाणतो तो आदर्श राज्यकर्ता या संत कबीरांच्या शिकवणीचे पंतप्रधानांनी स्मरण केले. जनतेत भेदभाव निर्माण करणाऱ्या सामाजिक रचनेवर संत कबीर यांनी कोरडे ओढले असा उल्लेख करत समाजातल्या गरीब आणि वंचितांच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या जन धन योजना, उज्वला योजना, विमा योजना, थेट लाभ हस्तांतरण, स्वच्छतागृहे यासारख्या योजनांचा आणि सुविधांचा उल्लेख त्यांनी केला. रस्ते,रेल्वे,ऑप्टिकल फायबर जाळे यासारख्या पायाभूत क्षेत्रात वेगाने वाढ होत असल्याचे ते म्हणाले. भारताच्या सर्व भागापर्यंत विकासाचा लाभ पोहोचावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असे त्यांनी सांगितले.

नव भारत साकारण्यासाठी संत कबीर यांची शिकवण आपल्याला उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)