जनताच “मन कि बात’ सांगेल

श्री. छ. उदयनराजे भोसले : वर्धनगड, नेर, बुध, नागनाथवाडी, डिस्कळ व निढळ येथे प्रचार दौरा

निढळ, दि. 16 (प्रतिनिधी) : उद्याची निवडणूक ही आता कोणा एकाची किंवा कोणत्या राजकीय पक्षाची राहिलेली नाही. ती आता सरकारी धोरणाने पिचलेला शेतकरी, जीएसटीमुळे मेटाकुटीला आलेला व्यापारी व उद्योग-व्यवसायिक, रेरा खाली दबलेला बांधकाम व्यवसायिक व नोटाबंदीत भरडली गेलेली समस्त जनता यांनी हातात घेतली आहे. लोकच आता मतदानाद्वारे स्वत:च्या “मन कि बात’ सरकारला खडसाऊन सांगतील, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या खटाव तालुक्‍यातील गावांचा धावता दौरा केला. यामध्ये त्यांनी वर्धनगड, नेर, बुध, नागनाथवाडी, डिस्कळ व निढळ या गावांत जाऊन प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, वडूजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, राजेंद्र कचरे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब जाधव, मानाजी घाडगे, अशोक पुरे आदी प्रमुख उपस्थित होते.

श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, “शासनाने दुष्काळी भागाकडे दुर्लक्ष करून येथील जनतेचे मोठे नुकसान केले. शासनाकडे इच्छाशक्ती नाही. येथील लोकांचे प्रश्न धसास लावले जातील. पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आचारसंहिता संपल्यानंतर बैठक लावून मार्ग काढला जाईल. केंद्रातील सरकारने नोकऱ्या देण्याऐवजी कित्येक लोकांचा रोजगार काढून घेतला. उद्योग, बांधकाम, शेती, व्यापार अशा सर्वच क्षेत्रावर सरकारच्या अविचारी धोरणांचा वाईट प्रभाव पडला. त्यामुळे भावी पिढीच्या भवितव्यासाठी सत्ता उलथून टाका.

आज देशाचा कृषीमंत्री कोण हे सांगता येत नाही. केवळ दोनच व्यक्तिंच्या हातात देशाची सर्व सुत्रे आहेत. अधिकारांचे हे केंद्रीकरण देशाला हुकुमशाहीकडे नेऊ पहात आहे. छत्रपतींच्या नावावर राज्यात राजकारण करणारे त्यांच्याच वारसाला साताऱ्यात अडवण्याचे काम करत आहेत. सातारचा आवाज मतदानाने दिल्लीत उदयनराजेंच्या रुपाने पाठवावा, असे आवाहन तेजस शिंदे यांनी केले.

डॉ. महेश गुरव म्हणाले, बुध, डिस्कळ, निढळ आणि परिसरातील जनतेने कायम श्री. छ. उदयनराजे भोसले यांची पाठराखण केली आहे. याही निवडणुकीत त्यांना मताधिक्‍य देऊ. या दौऱ्यात रमेश जाधव, मोहनराव पाटील, संजय चव्हाण, रामचंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर जगताप, नितीन नलवडे, गोविंद फडतरे, प्रशांत जंगम, ऋतूराज कदम, गणेश मेळावणे, वैभव वसव, सुमित कुंभार, दत्तात्रय गायकवाड,प्रशांत जंगम, जनार्दन जगदाळे, समीर सय्यद, राम घाटगे, अनिल जंगम, विजय खराटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)