जनऔषधी योजनेला “ब्रेक’

प्रशांत घाडगे

पिंपरी – राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानकावर प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 568 एसटी स्थानकावर स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतु, या योजनेच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड यासह राज्यातील इतर एसटी स्थानके स्वस्त जेनेरिक औषधांची वाट पाहत आहेत.

एस. टी. स्थानकात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक योजना सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली 27 डिसेंबर 2016 रोजी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि भारत फार्मा सार्वजनिक क्षेत्र यांच्यात एसटी स्थानकावर सर्वसामान्यांना परवडतील अशी स्वस्त जेनेरिक औषधे सुरु करण्याच्या करार झाला होता, परंतु, दीड वर्ष उलटल्यानंतरही या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

या योजनेत जेनेरिक औषधांच्या दुकानात सुमारे पन्नास ते साठ टक्के कमी दराने औषधे उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांवरील आरोग्याच्या दृष्टीने आर्थिक बोजा कमी होऊ शकेल. केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने जेनेरिक औषधांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही योजना कागदोपत्रीच अडकल्याने नागरिकांना स्वस्त औषधांची प्रतिक्षा करावी लागत आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेली योजना बारगळत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

“”सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासाठी जेनेरिक औषधांचे एसटी स्थानकावर उपलब्ध होण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या योजनेसाठी नियम, निविदा प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून आले. या प्रक्रियेतील जाचक अटी कमी केल्यास निश्‍चितपणे प्रतिसाद मिळू शकतो,” असे राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

औषध दुकानांमध्येही आदेश धाब्यावर
सध्या वैद्यकीय सेवा महाग होत चालली आहे. विशेषत: औषधांच्या किमती भरमसाट वाढत आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना औषधे खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रूग्णांना स्वस्तात गुणकारी औषध उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने जेनेरीक औषधांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरात जनऔषधी केंद्र सुरू करत त्याद्वारे जेनेरीक औषधे उपलब्ध करुन दिली जात आहेत. प्रत्येक औषध दुकानामध्ये जेनेरीक औषधांसाठी स्वतंत्र रॅक, स्वतंत्र जागा ठेवावी असे आदेश ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (औषध नियंत्रक) कडून देशभरातील औषध दुकानांना देण्यात आले आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे पिंपरी-चिंचवड शहरातील औषधांच्या दुकानांमध्ये पहायला मिळत आहे.

गोरगरीब रुग्णांसाठी जेनेरिक औषधे वरदान ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने वायसीएम रुग्णालयात जेनेरिक औषध पेढी सुरु केली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शस्त्रक्रियेचे साहित्य देखील याठिकाणी बाहेरील औषध पेढीपेक्षा 30 ते 40 टक्के सवलतीच्या दरामध्ये मिळत आहे. वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टरांना औषधाच्या चिठ्ठीवर जेनेरिक औषधे लिहून देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. जेनेरिक पेढीच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी औषधे पोहचवण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहोत.
– बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)