जगातील सर्वांत मोठ्या रेडिओ दुर्बिणीवर पुण्याचे “नियंत्रण’

टेलिस्कोप मॅनेजर विकसीत : राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे यश


ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत उभारला जाणार प्रकल्प

पुणे – जगात सर्वांत मोठ्या रेडिओ दुर्बिणीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दुर्बीण संचार व नियंत्रण प्रणाली (टेलिस्कोप मॅनेजर) पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) विकसित केली आहे. या संस्थेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समूहाने ही कामगिरी केली आहे.

मानवी शरीरातील मेंदू व मज्जासंस्था जशी काम करते, त्याच पद्धतीने “टेलिस्कोप मॅनेजर’चे कार्य असेल. त्यामुळे या कामगिरीला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.

-Ads-

ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे उभारण्यात येणाऱ्या या दुर्बीण प्रकल्पाच्या संगणकासाठी ही प्रणाली महत्वाची ठरणार आहे, अशी माहिती “एनसीआरए’चे संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिली. यावेळी प्रा. योगेश वाडदेकर, डॉ. तीर्थंकर राय चौधरी यांच्यासह या प्रणालीसाठी काम केलेले विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्क्वेअर किलोमीटर ऍरे (एसकेए) प्रकल्प हा विविध देशांनी मिळून उभारण्यात येणारा जगातील सर्वांत मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये स्थापन झालेल्या या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील “एनसीआरए’ व पुण्यातीलच टीसीएस रिसर्च व इनोवेशन या भारतातील संस्थासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, पोतुर्गाल, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथील विविध विविध संस्थांचा समावेश आहे. “एनसीआरए’च्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समूहावर दुर्बीणीच्या मुख्य संगणक प्रणालासाठी संचार व नियंत्रण प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मागील साडेचार वर्षांत हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करून इंग्लंड येथील “एसकेए’ संस्थेकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे.

एकूण 12 आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी समूहांमध्ये 20 देशातील सुमारे 500 शास्त्रज्ञ व अभियंते कार्यरत आहेत. या 12 समूहांपैकी 9 समूह दुर्बीणीसाठी लागणारे घटक यासाठी काम करीत असून उर्वरित 3 समूह दुर्बिणीच्या अद्ययावत उपकरण प्रणालींसाठी संशोधन करीत आहेत. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील समूहाने मागील चार ते साडेचार वर्षांत अतिशय क्‍लिष्ट व अत्याधुनिक अशा योजनाबद्ध संरचनेची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून एप्रिलमध्ये घेतलेल्या चाचणीमध्ये ही प्रणाली यशस्वी ठरली आहे. इतर समूहांचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)