राफेल लढाऊ विमाने त्वरीत मिळण्याची गरज – हवाईदलप्रमुख
नवी दिल्ली – जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताला बाह्य आक्रमणाचा मोठा धोका असून या अवस्थेत भारताला राफेल ही लढाऊ विमाने त्वरीत मिळण्याची गरज आहे असे प्रतिपादन हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ यांनी केले आहे.

एका परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की कोणतीही परिस्थिती एका रात्रीत बदलू शकते अशा स्थितीत भारताने सज्ज राहणे आवश्‍यक आहे. ते म्हणाले की भारताचे शेजारी निवांत बसलेले नाहीत. चीन सारखा देश हवाईदलाचे वेगाने आधुनिकीकरण करीत आहे. भारतालाही आपले हवाईदल सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. भारत सरकारने राफेल विमाने आणि एस-400 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारताचे संरक्षण मजबुत व्हायला मदतच होणार आहे असे ते म्हणाले.

भारत सरकारने फ्रांसकडून 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षाच्या सुरूवातीला ही विमाने भारताला मिळण्याची शक्‍यता आहे. तथापी सध्या राफेलच्या खरेदी किंमतीवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. या विमानाच्या खरेदीची किंमत मोदी सरकारने जाहीर केलेली नाही.

तसेच युपीएच्या काळात 126 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय झाला होता तो मोदी सरकारने रद्द करून केवळ 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मोदी सरकारनेच देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे असा आरोप सध्या केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)