जगभरात बलात्कारासाठीच्या शिक्षा…

विजयालक्ष्मी साने 

बारा वर्षांखालील मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगारांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढला असून राष्ट्रपतींनीही त्याला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देशभरातून बरीच मते समोर येत आहेत. काहींनी हा निर्णय अतार्किक असल्याचे म्हटले आहे. वयाचा निकष चुकीचा असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. अभिनेता आणि नव्याने राजकारणात आलेल्या कमल हसनने 14 ते 16 वर्षांपर्यंतच्या मुली बालिका नसतात का, असा उपरोधिक प्रश्‍न विचारला आहे. मागील काळात देशात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी सातत्याने होत होती. आताही ती मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर जगभरात बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील शिक्षेच्या तरतुदींविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरेल. 

चीनमध्ये बलात्कार करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. भारताच्या तुलनेत चीनमध्ये अशा घटना कमी होतात. पण, एखादी घटना घडली तर एक ते दीड वर्षांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा ठोठावली जाते. इराणमध्येही बलात्कार करणाऱ्याला मृत्यूच पत्करावा लागतो. मात्र, तेथील प्रक्रिया एकदम वेगळी आहे. तेथे प्रत्येक शहरामध्ये गुन्हेगाराला दंड देण्यासाठी अयातुल्लाह नियुक्‍त करण्यात आले आहेत. ज्या महिलेवर बलात्कार झाला असेल ती पीडिता त्याच्याकडेच आपली फिर्याद दाखल करते. त्यानंतर अपराधाच्या गांभीर्याच्या हिशेबाने अयातुल्लाह शिक्षा सुनावतात. मग पोलीस गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा देतात. म्हणजे तेथे शिक्षा आधी सुनावली जाते आणि नंतर गुन्हेगाराला पकडण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये नेहमीच सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. लेबनॉनमध्येही असेच होते. पण, तेथे हे काम जे करतात त्यांना काझी म्हटले जाते. सौदी अरेबियामध्ये पीडिता आणि तिचे कुटुंबीय यांची इच्छा असेल तर ते आरोपीची शिक्षा कमी करू शकतात किंवा माफही करू शकतात. जवळजवळ सर्वच मुस्लीम देशांमध्ये बलात्कारासाठीची आणि विवाहोत्तर संबंधासाठीची शिक्षा कठोर आहे. ही शिक्षा सार्वजनिक रूपातच दिली जाते.

अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये बलात्कारासाठी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. तेथे खटला दाखल होण्यापासून शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत जास्तीत जास्त दीड वर्षांचा कालावधी लागतो. पण, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया, लुईसियाना, लोवा, मोनटोना, ऑरेगान, टेक्‍सास आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बलात्कार करणाऱ्याचे ऑपरेशन करण्यात येते किंवा त्याला अशा प्रकारचे रसायन दिले जाते की, तो कोणत्याही अर्थाचा राहात नाही. तेथील न्यायाधीश हा पर्याय त्यावेळी निवडतात ज्यावेळी हे सिद्ध होते की, बलात्कारासारखा गुन्हा योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे किंवा सामूहिक बलात्कार आहे.

ब्रिटनमध्ये बलात्कार करणाऱ्याला देण्यात येणारी शिक्षा भारतासारखीच आहे. म्हणजे तेथे किमान सात वर्षांची शिक्षा दिली जाते किंवा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली जाते. सोव्हिएत संघ विघटित झाला नव्हता त्यावेळी बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येत होती. आता सोव्हिएत संघ राहिला नाही. सध्या असणाऱ्या रशियामध्ये बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला किमान चार वर्षांची आणि जास्तीत जास्त दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.

फ्रान्स हा देश संस्कृतीच्या बाबतीत फार समृद्ध आहे. त्यामुळे त्या देशात बलात्काराची वर्षातून एखादी घटना घडते. या देशामध्ये बलात्काराची शिक्षा म्हणून 20 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो. आपल्या देशात पूर्वी गंभीर घटनेतील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येत होती. तीही भर चौकात देण्यात येत असे. यामागचे कारण असे की, त्या गुन्हेगाराला कोणत्या प्रकारच्या शिक्षेची फळे भोगावी लागतात हे इतर लोकांनाही दिसावे आणि त्यांच्या मनात गुन्हे करण्याची दहशत निर्माण व्हावी. पण, नंतरच्या काळात माणूस आधुनिक झाला आणि त्यामुळे कायद्यांमध्येही बदल करण्यात आले. फाशीची शिक्षा ही अमानवी आणि अमानुष मानण्यात येऊ लागली. पण, जो गुन्हेगार अमानुष कृत्य करताना घाबरत नाही त्याला अमानुष शिक्षा देण्यात काय गैर आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.

मानवाधिकार संघटना या नेहमीच फाशीच्या शिक्षेला विरोध करत आल्या आहेत. आताच्या निर्णयालाही त्यांचा विरोध आहे. ज्या माणसाला आपण आयुष्य देऊ शकत नाही त्याचे आयुष्य हिरावून घ्यायचा आपल्याला काय अधिकार आहे, असा प्रश्‍न ते उपस्थित करतात. “जो माणूस दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यातून उठवतो त्या माणसाला आयुष्य गमावण्याचे काय दु:ख असणार? तसे ते त्याच्या मनात असेल तर त्याने गुन्हा करतानाच त्याचा विचार करायला हवा. पण, तसे होत नाही. आपण गुन्हा केला तरी मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील आणि आपल्यावरील गुन्हा सिद्ध झाला तरी आपली शिक्षा सौम्य होईल, असा विश्‍वास संभाव्य गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाला आहे, त्यामुळे सातत्याने गुन्हे करण्यास ते धजावतात आणि त्यांच्या अत्याचाराला निष्पाप जीव बळी पडतात त्यामुळेच आपल्याकडे कोवळ्या बालिकेपासून वृद्ध महिलांपर्यंत बलात्कार केले जातात आणि शिक्षा भोगून आल्यावर गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने फिरत राहतो,’ अशीही एक मांडणी केली जाते.

ही दोन मतप्रवाहांमधील- विचारसरणींमधील मतभिन्नता आहे. शासनाने मात्र यासंदर्भात व्यापक चर्चा घडवून न आणता 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सरसकट फाशीची शिक्षा असणारी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले जगभरातील देशांमध्ये बलात्काराला कशा शिक्षा देण्यात येतायत हे वाचून कळले असले तरी खालील शंका विचारात घेता हि माहिती अपुरी वाटते कारण १) न्यायानुसार प्रत्येक देशात बलात्काराची व्यख्या कशी ठरविण्यात आली आहे ? २) जगभरातील प्रत्येक देशात दरवर्षी किती बलात्काराच्या घटना घडतात व किती गुन्हेगारांना प्रत्यक्ष शिक्षा देण्यात येतात ? ३) किती देशात बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी अथवा गुन्हा काबुल नसण्यासाठी वकिलाची मदत घेतली जाते ? ४) अशा खटल्याना वेळेचे बंधन असते का ? ४) शिक्षा झालेल्या अथवा आजन्म कारावास भोगणार्या गुन्हेगारास कारागृहात कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)