जगन मोहन रेड्डींवर प्राणघातक हल्ला !

विशाखापट्टणम विमानतळावर युवकाने केला चाकूने वार 

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) : वायएसआर कॉंग्रेसचे नेते वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. विशाखापट्टणम विमानतळावर एका व्यक्तीने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर हा 30 वर्षाचा तरुण असून तो सेल्फी घेण्याच्या बहाण्याने जगन मोहन रेड्डी यांच्या जवळ पोहोचला होता. त्याने अचानक लहान चाकू काढला आणि रेड्डी यांच्या डाव्या खांद्यावर वार केला. त्यावेळी जगन मोहन रेड्डी हे हैदराबादेला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी जात होते. या हल्ल्यामध्ये जगन मोहन रेड्डी यांना खांद्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती ठिक आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हल्ल्याची घटना दुपारी 12.30 वाजता घडली. विमानतळाच्या परिसरातील “सीआयएसएफ’च्या जवानांनी त्वरित हल्लेखोराला पकडले आणि प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने जगन मोहन रेड्डी हैदराबादला रवाना झाले.

हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचे नाव जे श्रीनिवास राव असे आहे. विशाखापट्टणम विमानतळावरील कॅफेटेरियामध्ये वेटर म्हणून काम करत आहे. त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू हा कोंबड्यांच्या झुंजींदरम्यान वापरण्यात येणारा सर्वसाधारण चाकू होता. हे कॅफेटेरिया तेलगू देसम पार्टीचे नेते हर्षवर्धन यांच्या मालकीचे आहे, असा दावा वायएसआर कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. हर्षवर्धन हे पुढील वर्षीच्या निवडणूकीसाठी तेलगू देसम पार्टीकडून उमेदवारीसाठीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री एन चीना राजप्पा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या हल्ल्याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. जगन मोहन रेड्डी हे सध्या विझियानगरम जिल्ह्यामध्ये पदयात्रा करत आहेत. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते हैदराबादला आले होते. या हल्ल्याच्या घटनेनंतर वायएसआर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात निदर्शनेही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)