जगद्‌गुरू आद्य शंकराचार्य

 प्रासंगिक

 योगेश काटे

-Ads-

यतेनमः।। आर्यधर्मउद्धारकाय मायतमविनाशेन श्रीयत्‌ शंकराचार्य ज्ञानसूची. आपल्या भारतभूमीत अनेक संत, तत्त्वज्ञानी, विचारवंत होऊन गेले. मात्र, भारतीय संस्कृतीच्या इतिहासात तत्त्वज्ञान, आचार्य, संत पुरुष म्हणून आद्य शंकराचार्य यांचे स्थान व नाव अग्रक्रमाने घ्यावे लागले. आद्य शंकराचार्य यांचा जन्म ज्या कालखंडात झाला त्यावेळी सनातन धर्मास अवकळा आली होती. निरीश्‍वरवादी संप्रदाय, सनातन धर्मातील संप्रदाय, पंथ, उपपंथ, स्वतःच्या पंथाचे/संप्रदायाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास मग्न होते. अशावेळी आद्य शंकराचार्य यांनी धर्माला बळकटी आणण्यासाठी वैदिक तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे दृढ करून सनातन धर्मास लागलेले ग्रहण ज्ञानसूचीने व बुद्धीकौशल्याने नाहीसे केले.

संपूर्ण आर्यावर्तात पसरलेल्या समाजाला धर्माच्या एका धाग्यात गुंफण्यासाठी देशाच्या चार दिशांमध्ये चार धर्मपीठाची स्थापना केली आणि पंचायतन पूजेस सुरुवात केली. आद्य शंकराचार्य यांचे जीवन अनेक अलौकिक होते. त्यांनी तत्त्वज्ञान आणि वैचारिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली. प्रसिद्ध पाश्‍चात्य तत्त्वज्ञान व विचारवंत इमॅन्यूल कांट यांनी तत्त्वज्ञान क्षेत्रात ग्रीक क्रांतिकारक विचार आणले पण त्यापेक्षाही किती तरी मोठ्या प्रमाणात आचार्यांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात व वैचारिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात क्रांती घडवली.

वेदव्यास लिखित ब्रह्मसूत्र, श्रीमद्‌ भगवद्‌गीता आणि दशोपनिषदांवरील भाष्य लिहून श्रुतीसंपत अशा अद्वैत तत्त्वज्ञानाची ध्वजा फडकवली व पुनश्‍च भारतीय तत्त्वज्ञानावर व भारतीय समाजमनावर वैदिक तत्त्वज्ञानाचा ठसा उमटविला. यात त्यांचे प्रमुख विरोधी मत व प्रतिस्पर्धी निरीश्‍वरवादी व वेद प्रामाण्य न मानणारे तत्त्वज्ञ हे होते. तसेच तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने सांख्य मत हेसुद्धा विरोधी असे होते. शुद्ध वैदिक मत स्थापन करण्यासाठी त्यांनी वैदिक धर्मातील शैव, शाक्‍त, सौर, गाणपत्य व कापालिक अशा अनेक मतांचे खंडन केले. आचार्यांच्या तत्त्वज्ञानात कर्म, ज्ञान, भक्‍ती, योग यांचा अपूर्व असा संगम झालेला आहे. आचार्य यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सर्वांचा समन्वय केला आहे, हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी आचार्यांबद्दल असे म्हटले आहे की, “ते केवळ स्वप्न रंजनात रमणारे संत तत्त्ववेत्ते नव्हते, तर कृतीशील तत्त्ववेते होते.’ जर्मन तत्त्ववेत्ता डॉयसन म्हणतो की, “ज्यांनी शंकराचार्य यांचे साहित्य वाचले नाही त्यांनी या जगात काहीच वाचले नाही.’ तर प्रा. मॅक्‍समुल्लर आचार्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतात. थोर विचारवंत व समीक्षक तसेच भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक नरहर कुरुंदकर हे म्हणतात की, आद्य शंकराचार्य व ज्ञानदेव यांचे जीवन अभ्यासताना तर्क लुळा पडतो. सद्‌गुरू आद्य शंकराचार्य यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम जिज्ञासूंनी प.पू. आधुनिक महिपती संतकवी दासगणू महाराज यांनी आचार्यांच्या जीवनकार्य व तत्त्वज्ञानाबद्दल अत्यंत प्रासादिक विद्वत्ताप्रचूर बुद्धीला तसेच मनाला भिडणारे असे ओवीबद्ध/ पद्यात्यत व रसाळ भाषेत जगा जगद्‌गुरूंचे चरित्र लिहिले आहे. सर्व जिज्ञासूंनी व श्रद्धावंत भाविकांनी अवश्‍य वाचावे. जगद्‌गुरू आद्य शंकराचार्य यांची आज जयंती असून इथून पुढे हा दिवस “तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, ही इच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)