जगदंबेच्या जयजयकाराने राशीन दुमदुमले

राशीन – कडाडणाऱ्या हलग्या, झांज, ढोल- ताशांचा गजर, “उदो बोला उदो’ चा टिपेला पोचलेला आवाजामुळे राशीन आज दुमदुमून गेले.
नवरात्रोत्सवातील पहिल्याच माळेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरूणांच्या मंडळांनी जगदंबा देवीपुढे नतमस्तक होत मंदिरात पहाटेपासूनच ज्योती घेवून जाण्यासाठी गर्दी केली होती. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या राशीन जगदंबा (येमाई) देवी मंदिरात पांरपारिक पद्धतीत विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रातील पहिल्या पर्वास आरंभ झाला. आखोबा स्वामीचे वंशज महेशस्वामी शेटे व गुरव पुजारी सुनिल रेणूकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी अमोल शेटे, शिवदास शेटे, ट्रस्टचे पदाधिकारी तुकाराम सागडे, सुभाष रेणूकर, संदिप सागडे उपस्थित होते.
पहाटे देवीला महापुजा केल्यानंतर सकाळी पारंपारिक पद्धतीने घटस्थापना होऊन समोर अखंड नंदादीप पेटविण्यात आला. नवरात्रातील सुरूवात असल्याने देवीच्या सिहासनाच्या कमानीवर फुलांनी सजविण्यात मंदिर परीसरात रांगोळ्याची पखरण केली होती. नवरात्राच्या पुर्वसंध्येला विविध ठिकाणच्या तरूण मंडळांच्या जथ्थेच्या जथ्थे दाखल होऊन ज्योती पेटवुन प्रस्थान झाले. यावेळी देवीच्या नामघोषाने परिसर दुमदुमुन गेला होता. येथील नवरात्रोत्सवास चैतन्याच्या वातावरणात प्रारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)