जगताप, राठोड, कर्डिले, कळमकरांचे शस्त्र परवाना रद्दसाठी प्रस्ताव

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नोव्हेंबरमध्येच जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव वर्ग

नगर: केडगाव पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या झाली. पोलीस अधीक्षक कार्यालयाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या दुहेरी हत्याकांड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडीनंतर नगर शहरातील राजकीय गुन्हेगारी राज्यात चर्चेत आली. जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने ही परिस्थिती कायद्याचा वापर करत हाताळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्याविरोधात हत्याकांडाचा कट रचणे यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडीत राष्ट्रवादीचे सुमारे 175 कार्यकर्त्यांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली. हत्याकांडानंतर केडगाव येथे दगडफेक केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव यांच्यासह सुमारे 600 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविला गेला.

नगर शहरातील ही राजकीय गुन्हेगारीची धुळवड जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी रोखण्यासाठी कोठर असे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. शहरातील प्रमुख नेत्यांचे शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी वर्ग केला आहे. आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (रा. बुऱ्हाणनगर, ता. नगर), आमदार संग्राम जगताप (रा. मार्केट यार्ड, नगर), शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड (रा. नेता सुभाष चौक, नगर), माजी आमदार दादाभाऊ दशरथ कळमकर (रा. सावेडी, नगर), शहरप्रमुख दिलीप सातपुते (रा. भुषणनगर, केडगाव) व माजी नगरसेवक सचिन तुकाराम जाधव (रा. किंग्ज गेट, नगर) यांचे शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव 29 नोव्हेंबरला दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू केल्याचे समजते आहे. गौतम बोरा याचा शस्त्र परवाना महसूल अधिकाऱ्यांला दमदाटी करत मारहाण करणे आणि बेकायदेशीर सावकारकी प्रकरणांची दखल घेत तत्काळ रद्द केला होता. त्याचप्रमाणे या नेत्यांचे शस्त्र परवाना रद्द होण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार का, याकडे लक्ष लागले आहे.


संग्राम जगताप यांच्याविरोधात पाच गुन्हे

आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात कोतवालीला चार आणि भिंगार कॅम्पला एक गुन्ह्याची नोंद आहे. खून, दंगा, मारामारी, पळवून नेऊन खुनाचा प्रयत्न करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल आहेत.


अनिल राठोडांच्या विरोधात पाच गुन्हे

शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात कोतवालीला चार आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एक गुन्ह्याची नोंद आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, अनाधिकृत प्रवेश, जमावाने जाळपोळ करणे, दरोड्याचे गुन्हे दाखल आहे.


दिलीप सातपुते यांच्याविरोधात पाच गुन्हे

शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याविरोधात कोतवालीत तीन आणि तोफखाना पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणे, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.


शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात नऊ गुन्हे

आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. राहुरी तीन, भिंगार दोन, कोतवाली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहे. जमावबंदीचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा, रस्ता अडवणे, शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, फसवणूक करणे असे गुन्हे दाखल आहेत.


दादा कळमकर यांच्याविरोधात सात गुन्हे

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याविरोधात तोफखाना तीन, कोतवाली दोन आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल आहेत.


सचिन जाधव यांच्याविरोधात चार गुन्हे

माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्याविरोधात कोतवालीला एक आणि तोफखाना पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, नुकसान करणे, चोरी, विनयभंगासारखे गुन्हे दाखल आहेत. सचिन जाधव हे महापालिचे स्थायी समितीचे सभापती होते.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)