जगताप डेअरी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर

पिंपरी – जगताप डेअरी ते साई चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) हाती घेतलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. सप्टेंबरपर्यंत पुलाची एक बाजू पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे साई चौकावरील ताण कमी होणार असून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

पुणे-रावेत, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसराला पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गाशी व हिंजवडी आयटी क्षेत्राला जोडणाऱ्या साई चौकावर वाहतुकीचा मोठा ताण येत होता. त्यातच लष्कराने रक्षक रस्ता बंद केल्याने पिंपळे गुरवकडील वाहतूक साई चौकाकडे वळली होती. त्यामुळे वाहनांची अधिक भर पडल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर झाली होती. गर्दीच्या वेळी चौकामध्ये चारही दिशेला दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र नित्याचे झाले होते. चौकातील काही भाग प्राधिकरण, तर काही भाग महापालिका हद्दीत असल्याने दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

-Ads-

या पार्श्‍वभूमीवर पीसीएनटीडीएने जगताप डेअरी चौकात उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या पुलाची लांबी 770 मीटर आहे. पुलाची एक बाजू ऑगस्ट अखेर खुली करण्यात येणार होती. परंतु, पावसाळ्यामुळे डांबरीकरण करता येत नसल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. पावसाने उघडीप दिल्यास डांबरीकरणाचे काम पूर्ण होईल. ते काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीसाठी पूलाचा एक भाग सप्टेंबरमध्ये खुला करण्यात येणार आहे. तसेच पुलाचा दुसरा भाग पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चालू करण्यात येईल. महापालिकेचे टॉवर शिफ्टिंगचे काम चालू आहे. ते काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूचा पूल चालू होण्यास एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अ विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप खलाटे यांनी दिली.

जगताप डेअरी चौकातील उड्डाणपुलाचे काम टीएनटी इनफ्रा या कंपनीमार्फत सुरु आहे. 1 जानेवारी 2017 पासून कामाला सुरूवात झाली. या कामासाठी 27 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद आहे. मात्र, 31 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत पुलासाठी एकूण तरतुदीच्या पन्नास टक्के खर्च करण्यात आला आहे.
– संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)