जकात नाक्‍याच्या जागेवर खासगी वाहनांचा कब्जा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डुडुळगाव येथील बंद पडलेल्या जकातनाक्‍याच्या जागेवर सर्रासपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. अगदी दिवसा ढवळ्यासुद्धा याठिकाणी मद्यपी व जुगाऱ्यांचा वावर असतो. या प्रकाराने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची आग्रही मागणी या रहिवाशांकडून होत आहे.

श्री क्षेत्र आळंदी देवाचीहून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत डुडुळगाव येथे प्रवेश होतो. पुढे 15 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र देहू आहे. डुडुळगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर, शहराच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनांतील मालावर जकात आकारण्यासाठी डुडुळगावात जकातनाका उभारण्यात आला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी राज्यातील मुंबई वगळता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा जकातकर रद्द करण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करताना असलेले सर्व जकातनाके धुळ खात पडून आहेत.

डुडुळगाव येथील जकातनाक्‍यामागील काही अंतरावर आनंदवन ही कुष्ठरुग्णांची निवासी वसाहत आहे. याशिवाय याच परिसरात शैक्षणिक संस्था देखील असल्याने दिवसभर विद्यार्थी व विद्यार्थीनींचा वावर असतो. महापालिकेच्या वतीने याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली नसल्याने, जकातनाक्‍याची वास्तू बेवारस अवस्थेत आहे. या परिसरातील अनेक खासगी वाहनांची ही जागा हक्काचे पार्कींग झाले आहे. याशिवाय दिवसा-ढवळ्या जुगाऱ्यांचा पत्त्यांचा डाव रंगतो. रात्री अनेक समाजकंटकांचा याठिकाणी मुक्त वावर असतो. रात्री याठिकाणाहून महिलांना ये-जा करताना असुरक्षित वाटत आहे.

या जकातनाक्‍यासमोरच अवैधरित्या दारू विक्री करणारा ढाबा आहे. अनेक मद्यपी याठिकाणाहून दारू आणून याठिकाणी पीत बसतात. जकात नाक्‍यासाठी उभारलेल्या वास्तुवर या मद्यपींनी ताबा मिळविला आहे. देहू-आळंदी या दोन्ही तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यावर हे ठिकाण असल्याने वारकरी बांधवांकडून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

सार्वजनिक शौचालयासाठी जागा आरक्षित
राज्य सरकारच्या देहू-आळंदी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत राज्य सरकारने ही जागा सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित केली आहे. मात्र अद्यापही त्याजागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्यात आलेला नाही. यापूर्वी देखील ही जागा हस्तांतरित करण्याची मागणी पीएमपीएमएलने महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, राज्य सरकारच्या ताब्यात न दिल्याने या जागेचा आता दुरुपयोग सुरु झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)