जंतनाशक गोळ्यांविषयी पालकांमध्ये घबराहट

मुंबईमधील विषबाधा प्रकारमुळे गोळ्यांना स्थगिती, पुन्हा सुरू
पुणे – मुंबईमधील गोवंडीतील महापालिका शाळेतील्या प्रकारामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 140 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या गोळ्यांमुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील पालकांमध्येही घबराहट पसरली होती. मात्र चौकशी अंती या गोळ्या सुरक्षित असून विद्यार्थ्यांना या गोळ्या सुरू ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.
शहरातील शाळांमधील मुलांना जंतांची बाधा होऊ नये म्हणून जंतनाशक गोळ्या मोफत दिल्या जातात. मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना गोळ्यांमधून विषबाधा झाल्याचे वृत्त पसरताच पुणे महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांनी ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरुपात या जंतनाशक गोळ्या देऊ नका असे सांगितले. या विषयी त्यांनी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. आरोग्य विभागाकडून याबाबत चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास चौकशी झाली असून या गोळ्या पुन्हा सुरू करण्यास काही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. जो प्रकार झाला तो गोळ्यांमुळे झाला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असल्याने आरोग्य विभागाने या गोळ्या सुरक्षित असल्याचे सांगितले.
दरम्यान, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या 282 शाळांमधील 92 हजार विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात येतात. त्याचबरोबर खासगी शाळांमध्येही या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांविषयी दिवसभरात आरोग्य विभागाशी आम्ही संपर्कात होतो. कोणताही अनुचित प्रकार आमच्या समोर अद्यापपर्यंत आलेला नाही. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

पालिका शिक्षण विभागाकडे काही पालकांनी तक्रार नोंदविली होती. अन्य बाहेरच्या ठिकाणी असा प्रकार घडल्याचे समोर आल्याने पालक घाबरलेले होते. त्यामुळे गोळ्या द्याव्यात की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, शहरात असा कोणताही अनुचित प्रकार घडला नसून स्थगिती दिलेल्या गोळ्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– डॉ. केतकी घाडगे, प्रभारी सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)