जंकफूडवरील निर्बंध ‘कागदावरच’

महाविद्यालये, संस्थांच्या कॅन्टीनमधून उघड विक्री

यूजीसी, विद्यापीठाच्या आदेशाना केराची टोपली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालय व संस्थांच्या कॅन्टीनमधून जंकफूड विक्रीला निर्बंध घालण्याची सक्‍त ताकीद विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या निर्देशानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिल्या आहेत. मात्र, शहरातील काही संस्था अथवा महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधून सर्रास जंकफूड विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जंकफूड विक्रीवरील बंदी ही कागदावर राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी यूजीसीने जंकफूड विक्रीवर बंदी घातल्याचे पत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे. या निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांनी कार्यवाही करावी, असेही देसाई यांनी पत्रक काढले आहे. दरम्यान, यूजीसीने दोन वर्षापूर्वीच महाविद्यालय परिसरात जंकफूड विक्री बंदीचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचे नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करून यूजीसीने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत.

तरुणांमध्ये वाढत्या लठ्ठपणा विचार करून पिझ्झा, बर्गर, बेकरी उत्पादने विद्यापीठ व महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधून विक्री करू नये, अशी सक्‍त ताकीद देण्यात आली. मात्र शहरातील काही महाविद्यालयांत या आदेशाकडे दुर्लक्ष करीत जंकफूड विक्री होत आहे. याबाबत विचारणा केली असता “एक-दोन दिवस बंदी केली जाते. त्यानंतर जंकफूड पुन्हा सहजतेने उपलब्ध होते’, असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जंकफूडपासून होणारे दुष्पपरिणाम याबाबत उद्‌बोधन करावेत. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये जंकफूड होणाऱ्या परिणामाचा विचार करावा. याबाबत विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करून, तसा केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विद्यार्थी कल्याण मंडळाकडे सादर करावेत, असेही विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)