छ. शिवाजी संग्रहालयासाठी तातडीने निधी द्या

-आ. शिवेंद्रसिंहराजे; दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ करण्याच्या सुचना
-तिसऱ्या टप्प्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये निधीची गरज

सातारा – मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहराला इतिहासकालीन वस्तू आणि वास्तूंचा गौरवशाली वारसा लाभला आहे. सातारा शहरात ऐतिहासिक छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयासाठी जिल्हा क्रीडा संकुलाशेजारील शासकीय जागेत भव्यदिव्य आणि ऐतिहासिक सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशी भुईकोट (जमीनीवरील गड) प्रकारातील वास्तू उभारण्याचे काम सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाने तातडीने सुरुवात करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. दरम्यान, संग्रहालयाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये निधीची गरज असून राज्य शासनाने हा निधी तातडीने द्यावा. कोणत्याही परिस्थितीत संग्रहालयाचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. प्रसंगी रस्त्यावरही उतरु, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाला दिला आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन हे काम सन 2008 मध्ये मंजूर करुन घेतले होते. दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून इमारत उभी राहिली पण, पुढील काम निधी अभावी रखडले होते. दुसऱ्या टप्प्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्यानंतर या टप्प्यातील काम तातडीने सुरु होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले,माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, उपअभियंता आर. टी. अहिरे, मोहसीन मोदी, शाखा अभियंता रवी आंबेकर, दिग्विजय वंजारी, शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक सुर्वे यांच्यासह संग्रहालयाचे काम करणारे ठेकेदारही उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपये निधी नोहेंबर 2017 मध्ये मंजूर करुन घेतला होता. हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून इमारतीच्या आतील फर्निचर, अंतर्गत सजावट यासह संग्रहालय परिसरात बाग बगीचा निर्माण करणे आणि संग्रहालय परिसरात उपहारगृह, विश्राम गृह, तिकीट बुथ, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. निधी उपलब्ध झाला असून टप्पा क्र. 2 मधील कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाला दिल्या असून कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम विभागाला सुचीत केल्याप्रमाणे त्यांचे काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे पुरातत्व विभागानेही त्यांच्या अखत्यारीतील काम तातडीने सुरु करावे, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)