छेड गयो रे… (भाग – १ )

उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांचे नाव जगभरात उस्ताद विलायत खां आणि पंडित रविशंकर यांच्या बरोबरीने घेतले जात असले, तरी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांनी चित्रपट संगीतात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. 1946 सालच्या परवाना या चित्रपटापासूने ते अगदी सत्तरच्या दशकापर्यंत उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांनी चित्रपटसंगीतात अमूल्य योगदान दिले.

अनिल विश्‍वास, के दत्ता, नौशाद, वसंत देसाई, सी रामचंद्र, मदन मोहन आदी अनेक दिग्गज संगीतकारांच्या गाण्यांनाउस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांच्या सतारीचा परीसस्पर्श लाभला. मोगले आझम मधील मोहे पनघट पे….., प्यार किया तो डरना क्‍या…., या गाण्यातील सतारीइतकीच किंवा काकणभर जास्तच मोहीनी घालते,ती सी रामचंद्र यांच्या अनारकलीमधील . ये जिंदगी उसीकी है… या गाण्यातील सतार. ह्यांच्याकडून त्याबद्दल शेकडो वेळा ऐकून ऐकून माझे अगदी पाठ झाले आहे सगळे .कधी कधी माझी भावंडे मला विचारतात, बेबी तुला संगीतातले एवढे कधीपासून कळायला लागले? मी काय उत्तर देणार? हसून वेळ मारून नेते.

-Ads-

संताची उच्छिष्टे काय म्या पामरे म्हणतात ना. तसलाहा प्रकार. मात्र त्यामुळे गाणी ऐकायला माझा कान तयार झाला ही मात्र गोष्ट खरी. पूर्वी शब्द आणि चाल हेच मला महत्त्वाचे वाटायचे, पण आता त्यातील मधले तुकडे, वाद्यांची निवड याकडेही लक्ष जाऊ लागले आहे. त्यातल्या त्यात सतारीकडे जास्त. कारण ती घरचीच आहे.

मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे……
मी घरात प्रवेश केला, तर मोगले आझम मधले हे गाणे लावलेले होते, टीव्हीच्या पडद्यावर साक्षात मधुबाला होती आणि आमचे हे अगदी तल्लीनतेने बघत होते. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे आणि त्याहूनही आवडती आहे सतार. मोहे पनघट पे मध्ये मधुबालाचे लावण्य, तिचे नृत्य, गाण्याचे बोल, संगीत आणि त्यातील सतार – ही उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांनी वाजवलेली आहे…… सारा कसा मणिकांचन योग आहे. आताही मी ही दारातच थांबून गाणे ऐकत-बघत राहिले. गाणे संपले तर त्यानी ते पुन्हा एकदा लावले.(एखादे गाणे मनाचे समाधन होईपर्यंत पुन्हा पुन्हा ऐकणे-बघणे ही आमची सर्वांचीच आवड आहे.) आवाज मोठाच होता.

आमच्या टीव्हीचा स्क्रीनही मोठा आहे. मोहे पनघट पे पुन्हा लावताच हॉलमध्ये सतारींचा आवाज घुमू लागला. बादशहा अकबराचा दरबार, सोन्याच्या छोट्याशा पाळण्यात असलेली शुद्ध सोन्याचीच बाळकृष्णाची मूर्ती (ही माहिती आणि एकूणच मोगले आझमच्या भव्यदिव्य निर्मितीबद्दल भरपूर वाचलेले आहे.) हाती दोरी धरून हलके हलके झोके देणारे सम्राट अकबर, शेजारी असलेली प्रसन्न हसणारी महाराणी जोधाबाई, समोरचे ते कारंजे, दोन्ही बाजूला एका रांगेत हाती सतार घेऊन बसलेल्या त्या सुंदरी आणि त्यांच्या सतारीतून निघणारे मनभावन सूर…. सारा एक माहोलच बनून जातो. त्यातील सुरवातीचा सतारीचा तुकडा एखाद्या दुसऱ्या मिनिटाचाच असेल, पण तो सतारीचा तुकडा कितीही वेळा ऐकला-पाहिला तरी समाधान होत नाही.

 

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)