छत्रपती राजाराम मंडळाचे 75 फुटी भव्य शिर्डीचे साईमंदिर

पुणे  – हिंदू मुस्लिम ऐक्‍याचे प्रतिक आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईमंदिराचा भव्य देखावा यंदा सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळतर्फे साकारण्यात आली आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे साकारलेल्या 75 फूट उंचीच्या देखाव्याचे उद्‌घाटन व श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उगमस्थानापैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री गणपती देव ट्रस्ट छत्रपती राजाराम मंडळाने यंदा पुण्याच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त हा देखावा साकारला आहे.
देखाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट अणि साई संस्थानाचे विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे आदी यावेळी उपस्थित होते.
मंदिराची रचना पाहिल्यास प्रत्यक्ष शिर्डीत असल्याचा भास होतो. शिर्डी साई मंदिराची रचना व मांडणी याचा सखोल अभ्यास करुन हा देखावा साकारण्यात आला आहे. मंदिराची सुरुवात खंडोबा मंदिराने होते, त्यानंतर बाबांची शिळा, मुख्य सभामंडप, बाबांचे समाधी स्थान, साईबाबांची मूर्ती, गाभारा, द्वारकामाई, गुरुस्थान, मारुती मंदिर, चावडी, अब्दुलबाबा दर्गा, नंदादीप, पीरचे ठाणे आदींचा समावेश आहे.
युवराज निंबाळकर म्हणाले, हिंदुस्थानातील पहिला गणपती बसविणारे भाऊसाहेब रंगारी यांनी राजाराम मंडळाची मूर्ती साकारली आहे. शहराच्या मध्यवस्तीत मंडळाचा देखावा असल्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेत देखावा उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा उभारण्यात आला आहे. तसेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त दहा दिवसात गणेश आराधना आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी पुणेकरांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)