छत्रपतींच्या शिकवणुकीमुळेच भारताची जगाचे नेतृत्व करण्याकडे वाटचाल

प्रदीप रावत ः वनवासी कल्याण आश्रम आयोजित कै.ग.म.स्मृती व्याख्यानमालेचे उद्‌घाटन

नगर – भारताचा आजचा समृध्द वर्तमान हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाची देणगी आहे. शिवरायांनी त्याकाळात धर्मांध अशा परकीय आक्रमकांविरोधात संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी आपल्या देशातील इस्लामीकरणाचे कालचक्र थांबवले. त्यामुळेच छत्रपतींनंतरही संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई अशा अनेकांनी मुघलांविरोधात मोठा लढा दिला. अखंड हिंदुस्तानच्या फाळणीनंतर जन्माला आलेले पाकिस्तान, बांग्लादेश या राष्ट्रांची मानसिकता मध्ययुगीन इस्लामिक आक्रमकांची आहे. त्यामुळेच आज ते देश रसातळाला जात असून भारत मात्र दिमाखात जगाचे नेतृत्व करण्याकडे वाटचाल करीत आहे. हि गोष्ट केवळ छत्रपतींनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच शक्‍य झाली आहे,असे प्रतिपादन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी केले.
वनवासी कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनप्रसंगी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माजी खा.प्रदीप रावत यांनी शिवरायांच्या उत्तरकाळातील संघर्ष या विषयावर पहिले पुष्प गुंफले. तत्पूर्वी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी टिजेएसबी सहकारी बॅंकेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक जगदीश कामत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनिल देशपांडे, वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष मेघश्‍याम बत्तीन, शहर अध्यक्ष प्रशांत मोहोळे ,समीर पटवर्धन,अभय गोले , ब्रिजलाल सारडा, ऍड. अभय आगरकर, मनपाचे वाकळे आदी उपस्थित होते.
रावत म्हणाले कि ,दुर्देवाने सध्या आपल्या देशात तथाकथित पुरोगामी, डाव्या विचारसरणींकडून शिवरायांचे हिंदुत्त्व पुसट करण्याचा प्रयत्न होत आहेत. छत्रपतींनी ज्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली ती प्रेरणास्थानेच लपवण्याचा खटाटोप होत आहे. वस्तुनिष्ठ इतिहास दडवून नवीन काल्पनिक इतिहास माथी मारण्याचे काम सुरू आहे. इतिहास व वर्तमानाचे नाते असते. या देशाचे वर्तमान अस्तित्त्व राहिले ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे. भारतावर शेकडो वर्षे इस्लामी आक्रमकांनी अत्याचार केला. अशा काळात जन्माला आलेल्या शिवाजी महाराज यांनी या आक्रमकांविरूध्द सर्वसामान्यांची एकजूट करून हिंदवी स्वराज्य उभे केले. आपण कोणत्याही बलाढ्या शत्रूला नमवू शकतो, असा विश्‍वास त्यांनी सर्वसामान्यांमध्ये निर्माण केला. यातूनच एक मोठा इतिहास निर्माण झाला. छत्रपतींच्या अकाली निधनानंतर क्रूरकर्मा औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. त्याने मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी खुप प्रयत्न केले. परंतु, छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेतलेल्या लढवय्यांनी औरंगजेबाला यश मिळवू दिले नाही. संभाजी महाराज तर एकाचवेळी मुघल, सिद्दी, पोर्तुगीजांशी लढले. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी-धनाजी अशा अनेकांनी केलेल्या संघर्षातून मराठा साम्राज्य टिकले शिवाय त्याचा विस्तारही झाला.
छत्रपतींच्यानंतर झालेल्या या विषम संघर्षाला जगाच्या इतिहासात तोड नाही. दुर्देवाने पुढे अठराव्या शतकात आपण विज्ञानाशी फारकत घेतल्यामुळे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. इंग्रजांनी हिंदू समाजातील विभागणी बरोबर हेरून आपले कार्य तडीस नेले. आजच्या परिस्थितीतही राजकीय फायद्यासाठी पुरोगामी, डावे विचार असलेली मंडळी छत्रपती शिवरायांची प्रखर हिंदुत्त्वाची प्रतिमा पुसट करून चुकीचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्नकरीत आहेत. असेही रावत यांनी सांगितले.
सुनिल देशपांडे यांनी, कै.ग.म.मुळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वनवासी कल्याण आश्रम मागील 8 वर्षांपासून व्याख्यानमालेचा उपक्रम आयोजित करीत आहेत. मुळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय निष्ठावान स्वयंसेवक होते. संघाने नेहमीच समाजहिताचा विचार करणारे व प्रत्यक्ष कृती करणारे कार्यकर्ते घडवले आहेत. याच विचारांनी प्रेरित होवून मुळे यांनी कायम आपले योगदान दिले. बॅंकेतून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ संघ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. मुळे यांच्यासारखे स्वयंसेवक हीच संघाची खरी शक्ती, ताकद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत मोहोळे यांनी केले.वनवासी कल्याण आश्रमाच्या नगर शाखेच्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी सादर केली . नगर अर्बन को.ऑप.बॅंक, टीजेएसबी सहकारी बॅंक व जनता सहकारी बॅंक यांचे विशेष सहकार्य या व्याख्यान मालेसाठी लाभल्याचे त्यांनी सांगितले . पाहुण्यांचा परिचय समीर पटवर्धन यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. निळकंठ देशपांडे यांनी केले.चिन्मय देशपांडे यांनी गीत सादर केले. पसायदानाने या व्याख्यानाची सांगता झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)