दौंड – अनुसूचित जाती, जमातीच्या बांधवांना जातीचे दाखले देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती दौंड तालुक्‍याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
अनुसूचित जाती, जमातीतील भटक्‍या समाजाला जातीचा तसेच तत्सम सर्व दाखले देण्यासाठी मागील 60 वर्षांपूर्वीचा पुरावा मागितला जातो. परंतु हा समाज भटका असल्यामुळे त्यांच्याकडे असा कोणताही पुरावा उपलब्ध नसतो. त्यामुळे असे कोणतेही दाखले त्यांना मिळत नाहीत. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्‍यातील अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांच्या जातीचे दाखले, जात पडताळणी यांच्यासह इतर अनेक समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी (दि.06 सप्टेंबर 2018 ) श्रीकृष्ण मंगल कार्यालय, चौफुला या ठिकाणी दुपारी 12.00 वाजता या भव्य मेळाव्याचे आयोजन आमदार कुल यांच्या माध्यमातून केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार बालाजी सोमवंशी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमातीतील बांधवांनी कागदपत्रे जमा करून त्याची त्याच ठिकाणी पडताळणी आणि पंचनामे केले जाणार आहेत. तालुक्‍यातील सर्व गावांचे मंडल अधिकारी, तलाठी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून सर्व नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कुल यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)