चौथ्या औद्योगिक क्रांतीत देश अग्रेसर असेल

“सीएसआयआर’ चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांचे प्रतिपादन


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 114 वा पदवीप्रदान समारंभ

पुणे – जगात आधुनिक काळात झालेल्या तीनही औद्योगिक क्रांतींमध्ये भारत सहभागी होऊ शकला नाही. मात्र, आता “आर्टिफिशल इंटेलिजन्स’ आणि “मशीन लर्निंग’च्या निमित्ताने होऊ घातलेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारत जगात अग्रेसर राहील, याची काळजी युवकांनी घ्यायला हवी, असे प्रतिपादन वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 114 व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात 70 विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांना 118 सुवर्णपदके वितरित करण्यात आली. या व्या पदवीप्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 1 लाख 3 हजार 123 विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. मांडे म्हणाले, “जगात आधुनिक काळात तीन प्रमुख औद्योगिक क्रांती झाल्या. पहिली 17 व 18 व्या शतकात झाली. त्यानंतर 1920-30 च्या दशकात झाली. त्या वेळी भारत पारतंत्र्यात असल्यामुळे या दोन्ही क्रांतींमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतर 1960 च्या दशकात सेमीकंडक्‍टरच्या माध्यमातून तिसरी औद्योगिक क्रांती झाली. मात्र, त्या काळीही भारत त्यात सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे भारताच्या या तीनही संधी हुकल्या. पण आता आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए.आय.) आणि मशीन लर्निंग (एम.एल.) या माध्यमातून चौथी औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. त्यात आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला हवे.’

“माझ्या पिढीने पाहिलेली बाब म्हणजे आपण निसर्गाशी जुळवून घेण्याऐवजी आपल्या गरजांसाठी निसर्ग व परिसरावर आपल्या गोष्टी लादल्या आहेत. त्यामुळे माणूस आणि पर्यावरण यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. पुढील पिढ्यांवर स्वत:लाच टिकवण्यासाठी हे बदलण्याची जबाबदारी आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केल्यास तरूण पिढीला अशा प्रकारच्या प्रश्नांकडे टीकात्मक पद्धतीने पाहण्याची दृष्टी लाभेल. त्यातून नेमके उपाय करण्यास मदत होईल,’ असेही डॉ. मांडे म्हणाले. डॉ. नितीन करमळकर यांनी आपल्या दीक्षांत भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

स्वत:ला समाजाशी जोडून घ्या
संशोधन करणारी मंडळी इतर समाजापासून खूप मोठ्या प्रमाणात वेगळी राहत आहेत. ही राजकीय वर्गाचा आणि एकूणच समाजाकडून व्यक्त केली जाणारी चिंता आहे. याची तातडीने आणि गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. त्यासाठीच मी विद्यापीठांचे प्रमुख आणि तरूण पिढीतील संशोधकांना असे आवाहन करतो, की आपण हस्तिदंती मनोऱ्यात न राहत जमिनीवर येऊन स्वत:ला समाजाशी जोडून घेतले पाहिजे, असेही डॉ. मांडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)