चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत महत्त्वाचा

नवी दिल्ली – आता जागतिक पातळीवर नव्या तंत्रज्ञानावर आधारित चौथी औद्योगिक क्रांती होताना दिसत आहे. यात भारत महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो. कारण भारताची 50 टक्‍के इतकी लोकसंख्या ही 27 वर्षांच्या खालील असल्याचे जागतिक आर्थिक मंचने म्हटले आहे.

यामुळे भारतालाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मंचचे अध्यक्ष बोर्ज ब्रंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, या अगोदरच्या दोन औद्योगिक क्रांतीत भारताचा फारसा सहभाग नव्हता. त्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत नाही. मात्र, तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत भारत सहभागी झाला. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे. आता त्यामुळे भारत जगात वेगाने विकसित होणाऱ्या देशांच्या यादीत आहे. त्याचबरोबर भारताचा विकासदर वेगाने वाढत आहे. आता भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीतही सहभाग झाल्यास भारताचे उत्पन्न वेगात वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावरच चौथी औद्योगिक क्रांती आता उदयाला आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चैन तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज या आधारावर चौथी औद्योगिक क्रांती आता होत आहे. त्यात भारतातील तरुणांनी भाग घेण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्‍यक वातावरण तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या बाबीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाण्याचा धोका आहे. मात्र, त्याकडे लक्ष न देता सरकार आणि खासगी क्षेत्राने यात काम करण्याची गरज आहे. तसे झाले तर भारत स्वत:चे प्रश्‍न सोडवून जगालाही मदत करण्याची शक्‍यता खुली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंच या क्षेत्रात भारताबरोबर काम करणार आहे. नव्या तंत्रज्ञानाला समजून घेऊन त्यासाठी योग्य मन्युष्यबळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर स्मार्ट फोनचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बाबी नव्या तंत्रज्ञानाच्या विकसनासाठी आवश्‍यक आहेत.भारताकडे त्या सुदैवाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतीय नेतृत्वाने त्यासाठी आवश्‍यक वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारलाही याचा अंदाज आलेला आहे. त्याचबरोबर काही राज्यांनी या क्षेत्रात अगोदरच काम सुरू केले आहे. स्टार्ट अप चळवळ भारतात आता वेगाने वाढू लागली आहे.भारताने आपल्या शिक्षणातही या बाबीचा समावेश करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. तसेच या नव्या बाबी काही मूठभर लोकांच्या हातात राहणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. अन्यथा पुन्हा सर्वसमावेशक विकासात अडथळे येण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)