चौथा कसोटी क्रिकेट सामना; हादरलेल्या ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा आफ्रिकेचे आव्हान

जोहानसबर्ग – “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे एकापाठोपाठ एक आघात झाल्यामुळे कमकुवत बनलेल्या ऑस्ट्रेलियन संघासमोर उद्या (शुक्रवार) सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्या दैरहजेरीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयावर शिक्‍कामोर्तब करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सज्ज झाला आहे.

तिसऱ्या कसोटीत चेंडूची छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षासाठी, तसेच वेगवान गोलंदाज बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी बंदी घालण्यात आली आहे. परंतु या तिघांच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखणे धोक्‍याचे ठरेल, असा इशारा दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनीच आपल्या खेळाडूंना दिला आहे.

तिसऱ्या कसोटीत जे काही घडले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला जबरदस्त हादरा बसला आहे यात शंका नाही. तरीही त्यांचा संघ जबरदस्त आहे, असे सांगून गिब्सन म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाचा तर मी नेहमीच चाहता आहे. स्मिथ व वॉर्नर नसल्याने त्यांची फलंदाजी काही प्रमाणात कमकुवत झाली असली, तरी पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हॅझेलवूड हे तिघे संघात कायम राहिले असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीच्या संचाला धक्‍का लागलेला नाही.

चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 असा आघाडीवर असून तिसऱ्या कसोटीत 322 धावांनी विजय मिळविल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचा आत्मविश्‍वास कमवालीचा उंचावला असल्याचे आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने म्हटले आहे. स्मिथ, वॉर्नर व बॅंक्रॉफ्टच्या जागी खेळत असलेल्या मॅट रेनशॉ, जो बर्न्स व ग्लेन मॅक्‍सवेल यांना तर कसोटीपूर्वी सरावासाठी केवळ एक सत्र मिळणार असले, तरी शेफील्ड शील्ड स्पर्धेतील चांगल्या कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर या तिघांकडूनही कडव्या झुंजीचीच अपेक्षा असल्याचेही त्याने सांगितले. जो बर्न्सने कसोटी कारकिर्दीची आश्‍वासक सुरुवात केल्यानंतर आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 1 व 0 अशा कामगिरीमुळे तो संघाबाहेर गेला होता. रेनशॉ आणि हॅंड्‌सकोम्ब यांनी शेफील्ड शील्ड स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना फारसे काही करता आलेले नाही.
    केशव महाराजला संधी मिळणार?

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत वॉन्टरर्स मैदानावर नेहमीच वेगवान गोलंदाजांच्या ताफ्याला पसंती दिली आहे. परंतु तिसऱ्या कसोटीत महत्त्वाची भूमिका बजावणारा डावखुऱ्या फिरकी गोलंदाज केशव महाराजचा समावेश करण्याचा निर्णय झाल्यास अष्टपैलू खेळाडू वियान मल्डरला संघाबाहेर राहावे लागेल. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा दर्जा पाहता आफ्रिकेच्या फलंदाजांसमोरील आव्हान कोठेही कमी झालेले नाही. ऍब डीव्हिलिर्अच्या कामगिरीवर दक्षिण आफ्रिकेचा संघ नेहमीप्रमाणेच अवलंबून आहे. तरीही फाफ डु प्लेसिस, आयडेन मारक्रॅम व अनुभवी हाशिम आमला यांच्यासह यष्टीरक्षक-फलंदाज क्‍विन्टन डी कॉकलाही फलंदाजीत मोलाचा वाटा उचलावा लागेल. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या अननुभवी फलंदाजीचा पुरेपूर फायदा उठविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज सर्वतोपरी प्रयत्न करतील यात शंका नाही.

   प्रतिस्पर्धी संघ-

दक्षिण आफ्रिका- फाफ डु प्लेसिस (कर्णधार), आयडेन मारक्रॅम, डीन एल्गर, हाशिम आमला, ऍब डीव्हिलिअर्स, टेम्बा बाव्हुमा किंवा वियान मल्डर, क्‍विन्टन डी कॉक (यष्टीरक्षक), व्हर्नान फिलॅंडर, केगिसो रबाडा, केशव महाराज किंवा लुंगिसाना एन्गिडी आणि मॉर्नी मोर्केल.

ऑस्ट्रेलिया- टिम पेने (कर्णधार व यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, जो बर्न्स, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅन्ड्‌सकोम्ब, मिशेल मार्श, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन व जोश हॅझेलवूड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)