चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकास सक्तमजुरी

 

पुणे, दि.17 – भरधाव ट्रकने समोरच्या पिकअपला धडक देत पुढे जावून आणखी तीन ठिकाणी अपघात करुन चौघांचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच चौघांना जखमी केल्याप्रकरणी एका ट्रकचालकाला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या घटनेत सात वाहनांचे नुकसान झाले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी हा आदेश दिला आहे.
सोमनाथ गणपत मुळूक (वय 43, रा. चासकमान, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार आबाजी बाबुराव ठोंबरे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी 12 साक्षीदार तपासले. 25 मार्च 2012 रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लोणीकंद गावाच्या हद्दीत ही घटना घडली.
या घटनेत प्रिया चौहान (वय 1), प्रतिभा चौहान (वय 20), जितेंद्र साळवे (35), राजेंद्र कर्पे (65) या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिता जितेंद्र साळवे (25 रा. दिघी), अशोक ढोरे (रा. येरवडा), सुंदर चौहान (22 रा. लोणीकंद), रफिक अजिज शेख (52, रा. मंगळवार पेठ) हे चौघे जखमी झाले होते.
नगरच्या बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने पिकअप टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की पिकअप टेम्पो विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेला. पिकअप पलटी होताना त्याच्याखाली एक दुचाकी सापडली होती. पिकअपला धडक दिल्यानंतर ट्रक ड्रायव्हरने पुढे जावून एक जीपला आणि ऍपे रिक्षाला धडक दिली. एका किराणा मालाच्या दुकानाला ट्रक धडकला होता. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)